Abu Azmi : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी (Abu Azmi) यांनी वारी संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर आता शिवसेना (ठाकरे गट) आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी अबू आझमींना थेट इशारा दिला आहे.  "अबू आझमी यांनी जर राजकीय विषयावर बोललं असतं, तर ते खपून घेतलं असतं. पण त्यांनी पांडुरंगाच्या वारीवर केलेली टीका खपवून घेतली जाणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. 

शरद कोळी म्हणाले की, अबू आझमी तुम्ही दुसऱ्या कुठल्याही राजकीय विषयावर बोलले असते तर आम्ही खपवून घेतले असते. परंतु, तुम्ही पांडुरंगाच्या वारी वर बोलला आहात, हे खपवून घेतले जाणार नाही. अबू आझमी ज्या पद्धतीने बोलले आहेत, त्याच पद्धतीने कोल्हापूरच्या कातड्याची चप्पल आणून त्यांचं तोंड फोडल्याशिवाय शिवसैनिक शांत बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. 

कोल्हापूरच्या चपलेने त्यांचे तोंड फोडले जाईल

अबू आझमींच्या वक्तव्याने संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठी समाज बांधवांच्या आणि हिंदूंच्या भावना दुखावलेल्या आहेत. त्याला शिवसैनिक कधीच माफ करणार नाहीत. ते ज्या ठिकाणी दिसतील, त्या ठिकाणी त्यांना चपलांचा हार घालण्यात येईल. कोल्हापूरच्या चपलेने त्यांचे तोंड फोडले जाईल, असे देखील शरद कोळी यांनी म्हटले आहे. 

नेमकं काय म्हणाले अबू आझमी?

अबू आझमी यांनी म्हटले होते की, आजपर्यंत कोणत्याही मुस्लीम व्यक्तीने रस्त्यावर उत्सव का साजरे होतात? याची तक्रार केली नाही. पण, ज्यावेळी मशीद पूर्ण भरते तेव्हा काही मशिदीतील लोकं 5 ते 10 मिनिटं रस्त्यावर नमाज पठण करतात. त्यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणतात, रस्त्यावर नमाज पठण केलं तर पासपोर्ट रद्द करु. मी पुण्यातून येताना मला लोकांनी सांगितलं की, लवकर जाऊ अन्यथा पालख्यांमुळे रस्ता जाम होईल. रस्ता जाम होतोय, पण आम्ही कधी तक्रार केली नाही. पण नमाजसाठी तक्रार होते. याचा अर्थ जाणीवपूर्वक काही लोक मुस्लिमांच्या बाबतीत हे करत आहेत, असं वक्तव्य त्यांनी केले होते. 

अबू आझमींच्या वक्तव्याविरोधात आंदोलन

अबू आझमी यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात सोलापुरातील वारकरी रस्त्यावर उतरत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. अबू आझमी यांच्या 'वारीमुळे रस्ता जाम होतो' या वक्तव्याच्या विरोधात वारकऱ्यांनी टाळ वाजवत निषेध आंदोलन केले आहे. सोलापुरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात हे आंदोलन करण्यात आले. अबू आझामी यांनी त्यांचे विधान मागे घेतले नाही तर राज्यभरातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. 

आणखी वाचा

Abu Azmi on Pahalgam Terror Attack : पहलगाममध्ये 27 लोक मारले गेले, तरीही आतंकवादी पकडले नाहीत, आपला चौकीदार काय करतोय? अबू आझमींचा PM मोदींवर प्रहार