Maharashtra Weather Update: राज्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. नैऋत्य मोसमी पाऊस आता कोकणपट्टीसह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही बहुतांश ठिकाणी व्यापला आहे. मान्सूनने आठवडाभर राज्यभरात चांगलीच हजेरी लावली असून आता काहीशी उसंत घेतली आहे. मुंबईसह पुण्यात आता पुढील चार दिवस पावसाची ओढ कमी राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान केंद्राने दिलाय. आज तळकोकणात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट असून विदर्भात आज पावसाचा जोर चांगला राहणार आहे. उर्वरित भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचंही IMDनं सांगितलं .
हवामान विभागाचा अंदाज काय ?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून छत्तीसगड ओडिसा आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये सध्या मान्सून प्रवास करत आहे .येत्या तीन दिवसात कोकण गोवा मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे .29 मे ते दोन जून या कालावधीत मध्य महाराष्ट्र आणि कोकण व गोव्यात काही ठिकाणी तीव्र पावसाची शक्यता आहे . पण बहुतांश ठिकाणी पावसाची उघडीप असेल .
पुढील पाच दिवस हवामान कसे ?
आज गुरुवारी (29मे) रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह अमरावती, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे . छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, बुलढाणा, जळगाव, परभणी, हिंगोली, नांदेड, वाशिम, अकोला, यवतमाळ, रायगड, पुणे व साताऱ्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय . येत्या चार दिवसात कोकणपट्टी सह मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पावसाच्या अलर्ट आहेत .मात्र, दोन-तीन जिल्हे वगळता संपूर्ण महाराष्ट्रात येत्या चार दिवसात पावसाचा जोर ओसरणार आहे .
मुंबई-पालघरमध्येही पावसात काहीशी उसंत
बुधवारपासून मुंबई आणि पालघर भागातील पावसाचा जोर कमी होईल. मात्र, कोकणातील इतर जिल्ह्यांमध्ये 31 मेपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
शेतीची कामे खोळंबली, उन्हाळी पिके सुद्धा पाण्यात
दरम्यान, जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून सर्वदूर होत असलेल्या पावसाने शेतीची कामे पूर्ण ठप्प झाली आहेत. शिवारात सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने आणि पाऊस सुद्धा उघडीप देत नसल्याने शेतांमध्ये तळी साचली आहेत. त्यामुळे रोहिणी नक्षत्र सुरु होऊनही कोणत्याही प्रकारची पेरणी होऊ शकलेली नाही. जिल्ह्यात राधानगरी, भुदरगड तालुक्यात पावसाचा जोर सर्वाधिक आहे. दुसरीकडे, उन्हाळी हाताला पिके पाण्याने कुजली गेली आहेत. त्यामुळे भूईमूग, उन्हाळी, सूर्यफुल आदी पिकांना मोठा फटका बसला आहे. दुसरीकडे रोहिणी नक्षत्रात कोणत्याही प्रकारची पेरणीची चिन्हे दिसत नसल्याने पेरण्या लांबण्याची शक्यता आहे.