नवी दिल्ली :  राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे  यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यापुढे काम पाहणार आहेत.  दोघांकडे देखील वेगवेगळ्या राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा या राज्यांची जबाबदारी सुप्रिया सुळे यांच्याकडे देण्यात आली आहे. तर प्रफुल्ल पटेल यांच्याकडे मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान,  झारखंड या राज्याची जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिल्ली येथील वर्धपान कार्यक्रमात शरद पवारांनी ही घोषणा केली आहे.

  


अजित पवारांकडे कोणतीच जबाबदारी नाही


प्रफुल्ल पटेस, सुप्रिया सुळे यांच्या नावाची घोषणा करताना सुनील तटकरे आणि जितेंद्र आव्हाड यांना देखील जबाबदारी देण्यात आली आहे. सुनील तटकरे यांच्याकडे ओदिशा, पश्चिम बंगाल, शेती, अल्पसंख्याक या विभागांची  जबाबदारी देण्यात  आली आहे. तर जितेंद्र आव्हाडांनी बिहार, छत्तीसगड, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, कामगार या विभागांची जबाबदारी देण्यात आली आहे. अजित पवारांना मात्र कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही. अजित पवार या घोषणेवेळी  दिल्लीत उपस्थित होते. 






अखेर शरद पवारांनी भाकरी फिरवली...


शरद पवारांनी चेंबूर येथील सभेत पवारांनी भाकरी फिरवण्याची वेळ आलीय जर ती वेळीच फिरवली नाही तर करपू शकते असं म्हणत एक  इशारा दिला होता. त्यानंतर  'लोक माझे सांगाती' याच्या सुधारीत आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली होती. शरद पवारांच्या घोषणेनंतर सभागृहात एकच गदारोळ झाला. तरुण कार्यकर्त्यांचं सलग आंदोलन, देशभरातील विरोधी पक्षाच्या बड्या नेत्यांची विनंती यानंतर शरद पवारांनी राजीनामा मागे घेण्याचा निर्णय घेतला.  


आज राष्ट्रवादीचा 25 वा वर्धापनदिन


राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party) पक्षाचा 25 वा वर्धापन दिन आहे. पक्षाच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्या उपस्थितीत दिल्लीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 


हे ही वाचा :


Sharad Pawar: शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा मागे का घेतला? पाच महत्त्वाची कारणे...