Maharashtra Politics : जवळपास मागील 10 दिवसांपासून राज्याबाहेर असलेले शिवसेनेचे बंडखोर आमदार उद्या, 2 जुलै रोजी मुंबईत दाखल होणार आहेत. रविवारी आणि सोमवारी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. त्याआधी हे शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि इतर सहकारी घटक पक्षातील आमदार मुंबईत दाखल होणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली आहे. शिवसेना बंडखोर आणि इतर अपक्ष आमदार हे भाजप आमदारांसह हॉटेल ताजमध्ये वास्तव्य करणार असल्याचे म्हटले जात आहे. या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमदारांना संबोधित करण्याची शक्यता आहे.
मागील महिन्यात राज्यातील विधान परिषद निवडणूक पार पडल्यानंतर शिवसेनेत बंडाळी झाली. एकनाथ शिंदे यांच्यासह 10 ते 12 आमदारांनी सूरत गाठली. त्यानंतर शिवसेनेतील बंडखोर आमदारांची संख्या वाढत गेली. सूरतमध्ये जवळपास 37 आमदारांचा गट जमा झाला. त्यानंतर या गटाने गुवाहाटीमधील हॉटेल रॅडिसनमध्ये थांबले होते. त्यानंतर या ठिकाणी शिवसेनेचे 39 आमदार आणि अपक्षांसह जवळपास 50 आमदार गुवाहाटीत होते. तर, दुसरीकडे राज्यात राजकीय घडामोडीदेखील घडत होत्या. शिवसेनेत झालेल्या या अभूतपूर्व बंडामुळे पक्षातच मोठा रोष निर्माण झाला होता. शिवसैनिकांनी बंडखोरांविरोधात मोठ्या प्रमाणावर रोष व्यक्त केला होता. काही ठिकाणी शिवसैनिकांनी तोडफोडदेखील केली होती. त्यामुळे राज्यात तणाव निर्माण झाला होता.
बंडखोरांविरोधात शिवसैनिक आक्रमक होत असताना शिवसेना नेत्यांकडूनही आक्रमक भाषण केली जात होती. त्यामुळे बंडखोर मुंबईत अथवा राज्यात आल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. शिवसैनिकांच्या आक्रमक भूमिकेमुळे बंडखोर आमदारांना केंद्रीय सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याची घोषणा करताना शिवसैनिकांना शांततेचे आवाहन केले होते. त्यानंतर आक्रमक शिवसैनिक मवाळ झाल्याचे चित्र दिसून आले.
दरम्यान, विधानसभेच्या अधिवेशनाची तारीख बदलली आहे. विधानसभेचं अधिवेशन एक दिवसानं पुढे ढकलण्यात आलं आहे. शनिवारी आणि रविवारी म्हणजे 2 आणि 3 जुलैला होणारे अधिवेशन पुढे ढकलण्यात आलं आहे. हे अधिवेशन आता 3 आणि 4 जुलै रोजी होणार आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नव नियुक्त सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी हे अधिवेशन बोलावलं आहे. उद्यापासून हे अधिवेशन सुरु होणार होतं, पण आता अधिवेशनाची तारीख बदलण्यात आली आहे.