Maharashtra Politics: महाराष्ट्रचं नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या सत्ता संघर्षाच्या निकालाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) कामकाजाची यादी जाहीर झाली आहे. मात्र, या यादीत निकालाचा समावेश नाही. त्यामुळे पुढील दोन दिवसात निकाल लागेल का, या चर्चेला उधाण आले आहे. 


विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना पक्षात केलेली अभूतपूर्व बंडखोरी केली. त्यांच्या नेतृत्त्वात तब्बल 39 शिवसेनेच्या आमदारांनी पक्षप्रमुख आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आव्हान देत बंडाचे निशाण फडकवले. या घटनेला जून महिन्यात वर्ष होणार आहे. 21 जून 2022 रोजी महाराष्ट्रात विधानपरिषद निवडणुकीनंतर जे नाट्य रंगलं, त्यातून सत्तांतरापर्यंत आणि शिवसेनेच्या (Shivsena) फुटीपर्यंत घडामोडी घडल्या. तेव्हापासून हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आलं. 14 फेब्रुवारी ते 16 मार्च सलग सुनावणी झाली. आणि तेव्हापासून हा निकाल राखीव आहे. 


सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाकडून कोणता निकाल येतो, याकडे महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लक्ष लागले आहे. या खटल्याचा परिणाम देशातील राजकारणावर होणार आहे. पक्षांतर बंदीसाठी असलेल्या कलमाला या घटनेने आव्हान दिले गेले असल्याची चर्चा सुरू होती. 


आता निकाल कधी?


बुधवार, 10 मे रोजी कर्नाटक विधानसभेची निवडणूक आहे. कर्नाटकमधील मतदानानंतर निकाल येईल का अशी चर्चा होती. आता, सुप्रीम कोर्टातील कामकाजाच्या यादीनंतर उद्या, मतदानाच्या दिवशी निकाल येणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता 11 मे आणि 12 मे या दोन तारखेला निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. 


11 आणि 12 मे या दोन तारखांना का महत्त्व?


घटनापीठासमोर ही सुनावणी झाली, ते पाच न्यायमूर्तींचं घटनापीठ होतं. त्यापैकी एक न्या. एम आर शाह हे 15 मे रोजी निवृत्त होत आहेत.  त्यामुळे निकाल यायचा असेल तर त्याच्याआधीच येणार हे स्पष्ट आहे. न्यायमूर्तींच्या निवृत्तीचा शेवटचा दिवस हा समारंभाचा असतो. अगदी त्याच दिवशी निकाल जाहीर होण्याची शक्यता तशी कमी असते. 13 आणि 14 मे रोजी शनिवार आहे. त्यामुळे 8 ते 12 याच तारखांमध्ये निकालाची शक्यता अधिक होती. त्यापैकी आता 10 मे पर्यंतही निकाल नसल्याने आता 11 मे किंवा 12 मे रोजी निकाल येण्याची अधिक शक्यता आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: