मुंबई : राजकारणातील डिजिटल युगात गुप्त राहील असे काहीच नाही,असे म्हणत 'सामना'तून पवारांच्या गुप्तभेटीवर हल्लाबोल करण्यात आला आहे. महाराष्ट्र म्हणजे 'गंमत जंमत' नाही. दोन पवारांची 'गंमतभेट' आणि मुख्यमंत्र्यांचा वाढता आजार हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, महाराष्ट्र म्हणजे 'गंमत जंमत' नाही असे म्हणत शरद पवार आणि अजित पवारांच्या गुप्त भेटीवर सामनातून हल्लबोल करण्यात आल आहे.
अजित पवार आणि शरद पवारांच्या गुप्त बैठकीनंतर महाविकासआघाडीत अस्वस्थता असल्याचं पाहायला मिळालं आहे. पवारांच्या बैठकीनंतर जनतेत संभ्रम निर्माण झालाय, असं मविआ नेत्यांनी स्पष्ट सांगितलं तर याबाबत पवारांशी चर्चा करणार असल्याचं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय. रविवारी मातोश्रीवर नाना पटोले आणि उद्धव ठाकरेंची बैठक झाली. या बैठकीत गुप्त बैठकीवर चर्चा झाली आहे.
नक्की कुणावर हसावे व कुणावर चिडावे, हे महाराष्ट्राला कळेनासे झाले
उपमुख्यमंत्री अजित पवार हे शरद पवार यांच्या भेटीस वारंवार जात आहेत. विशेष म्हणजे शरद पवार या भेटी टाळत नाहीत हे गंमतीचे आहे. काही भेटी उघडपणे झाल्या, तर काही गुप्तपणे झाल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो,असा संभ्रम निर्माण व्हावा यासाठीच भारतीय जनता पक्षाचे देशी चाणक्य अजित पवारांना अशा भेटीसाठी ढकलून पाठवतायत काय? या शंकेला बळ मिळत आहे. अर्थात अजित पवारांच्या अशा भेटीने संभ्रम होईल, वाढेल यापलीकडे जनतेची मने पोहोचली आहेत. या रोजच्या खेळाने मनास एक प्रकारची बधिरता आली आहे व त्यास सध्याचे राजकारण जबाबदार आहे. राज्यातील सरकार हे 'गंमत जंमत' सरकार आहे. नानांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत आहोत, पण त्यात थोडी भर टाकून सांगतो, पवार काका-पुतण्यांच्या अलीकडच्या भेटीचा प्रकारसुद्धा गंमत जंमत ठरत आहे. नक्की कुणावर हसावे व कुणावर चिडावे, हे महाराष्ट्राला कळेनासे झाले आहे. शरद पवार यांची प्रतिमा अशा भेटीने मलीन होते आणि ते योग्य नाही.
शाहांच्या पुणे भेटीत नेतृत्व बदलाची बातमी फुटली, शिंदेचा आजार बळवला
अजित पवार यांनी त्यांच्या समर्थक आमदारांसह भाजपची वाट धरल्यावर सगळ्यात मोठी गंमत झाली ती एकनाथ शिंदे व त्यांच्या गटाची झाली आहे. आता तर शिंदे आजारी पडले असून त्यांची प्रकृती खूपच खालावली आहे. शिंदे हे 24 तास काम करतात म्हणून ते आजारी पडले, पण शिंदे 24 तास काम करतात ते महाराष्ट्रात कोठेच दिसले नाही. कधीही पद गमवावे लागेल या भीतीतून त्यांची झोप उडाली असेल तर त्यास 24 तास काम करणे असे म्हणता येत नाही. शिंदे यांची झोप उडाली की, ते ऊठसूट हेलिकॉप्टरने साताऱ्यातील त्यांच्या शेतावर आराम करतात. म्हणजे '24 तास काम व पुढचे 72 तास आराम' असे त्यांच्या जीवनाचे गणित दिसते व शिंदे यांच्या आजाराचे खापर अजित पवार यांच्यावर फोडले जाते. अजित पवार सरकारात घुसल्यावर शिंदे व त्यांच्या गटाच्या हृदयाचे ठोके वाढले आणि मन अस्थिर झाले.अजित पवारांमुळे त्यांच्या श्वासनलिकेत अडथळे निर्माण झाले व त्यांना अलीकडे गुदमरल्यासारखे होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना नक्की काय त्रास होतोय? त्यांचा आजार पसरलाय? आजाराचे मूळ काय? याबाबत आरोग्य मंत्र्यांनी विशेष बुलेटिन जारी केले तर बरे होईल, असा टोमणा सामनातून मारण्यात आला आहे.
सामनातून टीका
अजित पवार वारंवार शरद पवारांना भेटतात हा एक साथीचा आजार आहे व मुख्यमंत्री शिंदे आजारी पडून वारंवार विश्रांतीसाठी साताऱ्यातील शेतावर हेलिकॉप्टरने उतरतात हा महाराष्ट्रास लागलेला मानसिक आजार आहे. या दोन्ही आजारांत गुप्त असे काहीच राहिलेले नाही. खरे तर हा रोग महाराष्ट्राला लागला आहे व अशा रोगाचे लवकरात लवकर उच्चाटन होईल तेवढे बरे. अनेक आजारांनी सध्या महाराष्ट्र कृश व जर्जर झाला आहे. त्यात दिल्लीच्या टोळधाडी महाराष्ट्रावर हल्ले करीत आहेत. या सगळ्यातून महाराष्ट्र पुन्हा उभा राहील, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.
हे ही वाचा :
Maharashtra Politics : पवार काका पुतण्यांची भेट; ठाकरे-काँग्रेस बैठकीनंतर राऊतांचे महत्त्वाचं वक्तव्य, पवारांनी आता...