मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackray) यांच्या भेटीगाठी गेल्या काही दिवसांपासून वाढत चालल्या आहेत. कधी एकमेकांच्या घरच्या गणपतीच्या दर्शनासाठी, कधी शिवाजी पार्कातील दीपोत्सव, तर कधी एखाद्या एका उद्योजकाच्या समाजोपयोगी प्रकल्पासाठी अशा मिळून त्यांच्या तीन भेटी झाल्या होत्या. त्यापाठोपाठ आज राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाली ती महेश मांजरेकरांच्या वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्यानिमित्त. आता पुन्हा एकदा राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका कार्यक्रमात एकत्र दिसणार आहेत. 


  राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर शिंदे आणि ठाकरे यांच्या भेटी सातत्याने  अनेक कार्यक्रमात एकत्र पाहायला मिळत आहेत.  प्रशांत दामले यांच्या साडेबारा हजाराव्या प्रयोगाला तिघे एकत्र येणार आहेत.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत मनसे अध्यक्ष राज ठाकरेही उपस्थित राहणार आहेत. शिवाजी पार्कवरील दीपोत्सवानंतर आज तिन्ही नेते पुन्हा एकत्र येणार आहेत.  या सतत होणाऱ्या भेटींमागे आगामी काळातील युतीची नांदी तर नाही ना अशी चर्चाही आता रंगू लागली आहे. 


सध्या जरी या भेटींमागे राजकीय कारण नसल्याचं सांगितलं जात असलं तरी आगामी काळात मनसे शिंदे गट युती होण्याची शक्यता नाकरता येत नाही. अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपने माघार घ्यावी अशा आशयाचं राज ठाकरे यांनी पत्र लिहिण्यापूर्वीच त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. आणि त्यानंतर उमेदवार मागे घेण्यात आला. दीपोत्सव, सदिच्छा भेट सुरुच असल्याचं चित्र पाहायला मिळालं. भाजप शिंदे गटाकडून मुंबईतील मराठी पट्ट्यातील जागा आपल्या ताब्यात घेण्यासाठी मनसे शिंदे युतीची चर्चा सुरु झाली. 


खरंतर राज ठाकरे यांची परप्रांतीयांबाबत असलेली भूमिका भाजप मनसे युतीसाठी मारक आहे असं वारंवार भाजपच्या नेत्यांकडून ऐकायला मिळालं होतं. मात्र सध्या भाजपसोबत असणारा शिंदे गट मात्र मनसे युतीसाठी पुरक असल्याची चर्चा भाजपच्या गोटात आहे. त्यामुळे शिंदे- ठाकरे युती झाल्यास याचा थेट फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे. याचा प्रत्यय देखील दीपोत्सवाच्या निमित्ताने तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येऊन महाराष्ट्राला दिला आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता महाविकास आघाडीविरोधात दुसऱ्या बाजूने मजबूत आघाडी देणं गरजेचं आहे. फक्त भाजप आणि शिंदे हे महाविकास आघाडी किंवा मुंबईत शिवसेनेचा पराभव करु शकत नाहीत. त्यामुळे मनसेला सोबत घेणं ही काळाची गरज असल्याचे भाजप आणि शिंदे गटाने मनाशी पक्के केले आहे.