Maharashtra Politics News : अजित पवार यांनी बंड केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन गटात विभागाला गेला. अजित पवार यांनी काही आमदारांना हाताशी धरत सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. अजित पवार विरोधीपक्षनेते होते, ते सरकारमध्ये सामील झाले. आता हे विरोधीपक्षनेतेपद काँग्रेसच्या वाट्याला जाणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्याकडील आमदारांची संख्या कमी आहे. काँग्रेसकडे सर्वाधिक आमदार आहेत, त्यामुळे विरोधीपक्षनेतेपद काँग्रेसला जाणार हे जवळपास निश्चित मानले जातेय. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी सहमती दर्शवल्याचेही समजतेय. 


काँग्रेसने विरोधीपक्षनेतेपदावर दावा केलाय. त्याला शरद पवार आणि उद्धव ठाकरेंकडून सहमती दर्शवली आहे. काँग्रेसमधील दुसऱ्या फळीतील नेत्याकडे ही जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी चार नावांची जोरदार चर्चा आहे. सुनील केदार, विजय वड्डेटीवर, यशोमती ठाकूर, संग्राम थोपटे  यांच्या नावाची सध्या काँग्रेसमध्ये जोरदार चर्चा आहे. नाना पटोले प्रदेशाध्यक्ष राहणार आहे. बाळासाहेब थोरात काँग्रेस गटनेते  राहणार त्यात बदल नाही, असे समजतेय. 


उद्यापासून राज्यात पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी विरोधीपक्षनेतेपद भरले जाणार आहे. काँग्रेसच्या आमदारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे विरोधीपक्षनेतेपद त्यांच्याकडेच राहणार आहे. या पदासाठी नव्या दमाच्या नेत्यांना जबाबदारी देण्याची शक्यता आहे.  काँग्रेसमधील दुसऱ्या फळीतील नेत्याकडे विरोधीपक्षनेतेपद जाण्याची शक्यता आहे. दिल्लीमध्ये याबाबत चर्चा सुरु आहे. लवकरच याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात येईल. 


बाळासाहेब थोरात काय म्हणाले ?


विरोधी पक्ष नेते संदर्भात आम्ही दिल्लीत वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार आहोत. उद्याच्या अधिवेशनात महत्त्वाच्या मुद्द्यांवर आम्ही बोलणार आहोत. पत्रकार परिषद झाली अंबादास दानवे प्रमुख होते ते विरोधी पक्षनेते आहेत. राष्ट्रवादीशिवाय पत्रकार परिषद झाली असे म्हणता येणार नाही, एकनाथ खडसे सहभागी होते.. राष्ट्रवादीतल्या भेटीगाठी आम्हीही पाहिल्या, प्रफुल पटेल यांची प्रतिक्रिया ही पाहिली पण मी त्यावर जास्त काही भाष्य करणार नाही, त्यांच्या पक्षातील लोकांनी यावर बोलावं..महिला अत्याचार, शेतकरी अडचण, दंगली आणि अनेक प्रश्न आहेत जे अधिवेशनात आम्ही मांडणार आहोत. हायकमांड विरोधी पक्षनेत्यावर निर्णय घेतला जाईल, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.


उद्यापासून पावसाळी अधिवेशन, विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
Maharashtra Monsoon Session 2023 :  महाराष्ट्र विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशन (Maharashtra Monsoon Session 2023) उद्यापासून सुरु होणार आहे. 17 जुलै ते 14 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. हे अधिवेशन मुंबईत (Mumbai News) पार पडणार असून 15 दिवस सुरू राहणार आहे. दरम्यान, 17 जुलै पासून सुरु होणारे पावसाळी अधिवेशन वादळी होण्याची शक्यता आहे. अधिवेशन सुरु होण्यापूर्वीच विरोधक एकवटले असून राज्य सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला आहे. अजित पवार गट सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर पहिलेच अधिवेशन होणार आहे. विरोधक कोणत्या मुद्द्यावरुन सरकारला घेरणार.... सरकारकडून उत्तरे कशी दिली जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेय. विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकलाय.