Maharashtra Politics, NCP Leader Ajit Pawar : कारण नसताना माझ्या आणि माझ्या सहकाऱ्यांबद्दल गैरसमज पसरवला जात आहेत. जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. या बातम्यांमध्ये कोणतंच तथ्य नाही, असं म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांच्या भाजप प्रवेशाबाबतच्या चर्चांवर स्पष्टीकरण दिलं. जोपर्यंत जिवात जीव आहोत, तोपर्यंत पक्षासोबत राहाणार. या चर्चा थांबवा, तुकडा पाडा, असं म्हणत अजित पवारांनी या चर्चांना पूर्णविराम दिला. ते मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.


पूर्ण आमदारांच्या सह्या घेण्याचं कारण नाही. आम्ही राष्ट्रवादीचे आमदार आहोत, राष्ट्रवादीतच राहणार आहोत. मी नेहमीप्रमाणे माझ्या ऑफिसमध्ये बसतो, अनेक जण कामानिमित्त येत असतात. नेहमीप्रमाणे आमदार मला भेटायला आले. त्यात वेगळा अर्थ काढू नका, असंही अजित पवार म्हणाले. सध्या निर्माण झालेले प्रश्नांवरुन लक्ष विचलित करण्यासाठीं हा प्रकार सुरु असल्याचं अजित पवार म्हणाले.


अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेतील 10 प्रमुख मुद्दे...



  1. कारण नसताना माझ्याबाबत आणि माझ्या सहकाऱ्यांबाबत गैरसमज निर्माण करण्याचं काम सुरु आहे.

  2. भाजप प्रवेशाच्या बातम्यांमध्ये काहीच तथ्य नाही माझ्याबाबत चुकीच्या बातम्या दाखवल्या जात आहेत.

  3. 40 आमदारांच्या सह्या घेतलेल्या नाहीत. आम्ही राष्ट्रवादीत राहणार आहोत. इतर राजकीय पक्षाचे नेते याबाबत बोलत आहेत मात्र मी त्याबाबत बोलणार नाही

  4. प्रत्येक मंगळवारी आमदार मला भेटतात, हे नेहमीचे आहे. अनेक आमदारांचं काम होतं म्हणून आले होते, त्याचा वेगळा अर्थ काढू नका

  5. आमदारांबाबत चुकीच्या बातम्या देऊ नका कारण संभ्रम निर्माण होतं आहे. राष्ट्रवादी काँगेस पक्षात चढउतार आले आहेत. आम्ही तिथच राहणार आहोत.

  6. सध्या निर्माण झालेल्या प्रश्नांवरुन लक्ष विचलित करण्यासाठी हा प्रकार सुरु आहे

  7. जिवात जीव असेपर्यंत पक्षासोबत कायम राहाणार, पक्षाचं काम करणार. चर्चा थांबवा, तुकडा पाडा 

  8. महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमातील दुर्घटना ही सरकारनिर्मित आपत्ती, माणसाच्या जीवाशी हे का खेळले याचं उत्तर द्यावं.

  9. राजभवनला हॉलमध्ये हा सोहळा घेता आला असता मात्र यांनी निष्काळजीपणा नडला आहे.

  10. राजकारण्यांना राजकारण साधायचं होत का? सरकारने या प्रकरणी संवेदनशीलता दाखवली नाही


40 आमदारांच्या सह्या घेतल्याचं वृत्त, अजित पवारांचं स्पष्टीकरण


अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) 53 पैकी 40 आमदारांच्या सह्या घेतल्याचं वृत्त समोर आलं होतं. 'द न्यू इंडियन एक्स्प्रेस' या इंग्रजी वृत्तपत्राने ही बातमी दिली होती. सह्या मिळवण्यासाठी अजित पवार राष्ट्रवादीच्या आमदारांना फोन करत आहेत, असंही वृत्तात म्हटलं आहे. शिवाय यंदा शरद पवार हे सगळं थांबवण्याचा प्रयत्न करत नाहीत, असंही द न्यू इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तात म्हटलं आहे. 2019 साली अजित पवार यांचं बंड शरद पवार यांच्यामुळेच फसलं होतं. कारण अजित पवारांसोबत गेलेल्या सर्व आमदारांना थोरल्या पवारांनी स्वतः फोन केले होते. मात्र यंदा तसं काहीही होताना दिसत नाही. परंतु अजित पवार यांनी हे वृत्त फेटाळलं आहे. "नव्या समीकरणांच्या फक्त चर्चा आहेत. यात काही तथ्या नाही. मी पुन्हा पुन्हा प्रतिक्रिया देणार नाही, मीडिया स्वतःच्या मनाने बातम्या चालवत आहे," असं अजित पवार म्हणाले.