Sharad Pawar:  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मीडियावरून धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. राज्याच्या राजकारणात आज दोन मोठ्या नेत्यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने एकच खळबळ उडाली. 


राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नंतर आज खासदार संजय राऊत आणि त्यांचे बंधू आमदार सुनिल राऊत यांना देखील फोनवरून धमकी आल्याचा प्रकार समोर आला. 


राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना राजकारण महाराष्ट्राचं या नावाच्या ग्रुपवर तुमचा दाभोळकर करु अशा आशयाची जीवे मारण्याची धमकी आली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात जाऊन धमकी प्रकरणाची माहिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेस या प्रकरणावर चांगलीच आक्रमक झाली आहे. पवारांना धमकी देणारा आरोपी भाजपशी संबधित असल्याचे म्हटले जात आहे.  


पवारांच्या धमकी प्रकरणी कोणाविरोधात गुन्हा दाखल 


शरद पवार धमकी प्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. राष्ट्रवादीकडून करण्यात आलेल्या तक्रारीनुसार नर्मदाबाई पटवर्धन आणि सौरभ पिंपाळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादंवि कलम 153 A, 504, 506(2) अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखा पुढील तपास करत आहेत. 


तर शिवसेना खासदार संजय राऊत यांना आणि त्यांचे बंधू आमदार सुनील यांना देखील फोनवरून धमकी आली. धमकी देणाऱ्याने संजय राऊत यांनी सकाळची पत्रकार परिषद बंद करावी अथवा भावासह जीवे मारण्यात येईल अशी धमकी दिली. 


राऊत यांना धमकी देणारे दोघेजण अटक 


शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना धमकी देण्याच्या प्रकरणात दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राऊत यांनी फोन करून गोळ्या घालण्याची धमकी देण्याच्या प्रकरणात दोघेजण ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणात अजून गुन्हा दाखल झाला नाही. राऊत यांच्याकडून या प्रकरणात कोणीही तक्रार दिली आली नाही. पोलिसांकडून गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई केली जाणार. ताब्यात घेण्यात आलेले दोन्हीही गोवंडीतील राहणारे आहेत. नशेच्या धुंदीत त्यांनी ही धमकी दिली असल्याची प्राथमिक माहिती आहे. 


आज घडलेल्या घटनेनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेची गंभीर दखल घेत कुठल्याही राजकीय व्यक्तीला धमकी देणे खपवून घेणार नसल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणी गृहखातं तत्काळ कारवाई करेल असं आश्वासन देखील दिलं आहे


विरोधी पक्षाने मात्र राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याची टीका सरकारवर केली आहे. जयंत पाटील यांनी टीका करताना धमकी देणाऱ्याला दोन तासात अटक व्हायला हवी होती, मात्र अद्याप अटक झालेली नाही असं म्हटलं. जर खरच चौकशी झाली तर याचे मूळ कदाचित दाभोलकर हत्याकांडापर्यंत जाऊ शकेल असंही त्यांनी म्हटलं.