Maharashtra Politics Shivsena: ठाकरे गटाने (Shivsena Thackeray Faction) निवडणूक आयोगाला (Election Commission) सादर केलेली हजारो शपथपत्रं बोगस असल्याचा आरोप शिंदे गटाने केल्यानंतर या प्रकरणी पोलिसांच्या गुन्हे शाखेनं तपास सुरु केला आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची (Mumbai Police Crime Branch) चार पथके कोल्हापूर (Kolhapur), पालघर (Palghar), अहमदनगर (Ahmednagar) आणि नाशिक (Nashik) इथे दाखल झाली आहेत. पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात याचा तपास करण्यात येणार आहे. ठाकरेंच्या समर्थनार्थ दिलेली सुमारे साडेचार हजार शपथपत्रं बोगस असल्याचा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. मुंबईत या प्रकरणी गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे.
शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बंडखोरी झाल्यानंतर शिंदे गटाने धाव घेत पक्षावर दावा केला आहे. शिवसेना पक्ष आपल्याकडे राहावा यासाठी ठाकरे आणि शिंदे गटाचा प्रयत्न सुरू आहे. निवडणूक आयोगासमोर असलेल्या संघर्षात दोन्ही गटांकडून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे प्रतिज्ञापत्र दाखल केले जात आहेत.
काही दिवसांपूर्वी वांद्रे येथे जवळपास 4600 च्या आसपास बनावट प्रतिज्ञापत्र तयार केले जात असल्याचे समोर आले होते. या प्रकरणी मुंबईत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही प्रतित्रापत्रे ठाकरे गटांसाठी तयार केली जात असल्याचा दावा शिंदे गटाने केला. नोटरी करणारी व्यक्तीच प्रतिज्ञापत्र भरून देत असल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे.
या बनावट प्रतिज्ञापत्राचा तपास मुंबई पोलिसांच्या गु्न्हे अन्वेशषण विभागाने सुरू केला आहे. मुंबई क्राईम ब्रांचची चार पथके कोल्हापूर, पालघर, अहमदनगर, नाशिक इथे दाखल झाली आहेत. पोलीस अधीक्षक कार्यालयात उद्यापासून करणार तपास सुरू करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.
पालघरमध्ये मुंबई पोलिसांचे पथक दाखल
पालघर जिल्ह्यातून 140 प्रतिज्ञापत्र ठाकरे गटांच्या नावाने सादर केली आहेत. याचा तपास करण्यासाठी सध्या मुंबईची टीम पालघर मध्ये दाखल झाली आहे. गरज लागली तर पालघर पोलीस विभागाची मदत घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.