Jalgaon Abdul Sattar : मंत्री अब्दुल सत्तार (Abdul sattar) धरणगावात (Dharangaon) शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी जात असताना उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अब्दुल सत्तार यांच्या वाहनाच्या ताफ्यावर कापूस फेकला. तसेच खोके दाखवत जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करत मंत्री सत्तार यांचा निषेध केला.


राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे आज जळगाव (Jalgaon) जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. गेल्या काही दिवसांपूर्वी काही पावसामुळे जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान (Unseasonal Rain) झाला आहे. अब्दुल सत्तार हे आज उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार, धुळे (dhule) तसेच जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दरम्यान त्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात नुकसान ग्रस्त शेताची पाहणी करण्यासाठी अब्दुल सत्तार यांचा ताफा जात असताना यावेळी महामार्गावर ठाकरे गटाचे (Thackeray Sena) जळगाव जिल्ह्याचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, पदाधिकारी निलेश चौधरी यांच्यासह कार्यकर्त्यांनी हातात कापूस तसेच खोके घेऊन जोरदार घोषणाबाजी केली. 50 खोके एकदम ओके अशी घोषणाबाजी करत, अब्दुल सत्तार यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला तसेच अब्दुल सत्तार यांच्या ताफ्यातील वाहनांवर कापूस फेकून निषेध व्यक्त केला.


दरम्यान कापसाला योग्य तो भाव मिळालेला नाही, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकरी संकटात असल्याने कापसाला दहा ते बारा हजार रुपये भाव मिळावा, या मागणीसाठी कृषिमंत्री यांची भेट घेणार होतो. मात्र पोलिसांकडून भेट नाकारण्यात आली. त्यामुळे कापूस दाखवून त्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. धावती भेट अब्दुल सत्तार देत असून शेतकऱ्यांच्या व्यथा सुद्धा जाणून घेत नाही. त्यामुळे त्यांचा निषेध व्यक्त करण्यात आल्याचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांनी सांगितलं.


आंदोलनातून निघाल्यानंतर कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी धरणगाव तालुक्यातील एका शिवारात शेताची पाहणी केली. उद्या सायंकाळपर्यंत जळगाव जिल्ह्यात नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे हे झाले पाहिजे,  शेतकऱ्यांच्या बांधावर एकही शेतकरी पंचनाम्यापासून सुटायला नको,  फळबागा असतील भाजीपाला असेल. तसेच इतर सर्व ज्या ज्या पिकांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. त्या सर्वांचे पंचनामे करून 25 तारखेपर्यंत अहवाल पाठवा, असे आदेश यावेळी पाहणी करताना कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना दिले. तसेच एकही शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही असे आश्वासनही या पाहणी दरम्यान कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिले.