Devendra Fadnavis On Bachchu Kadu: बच्चू कडू (Bachchu Kadu) हे माझ्या एका फोन कॉलवर गुवाहाटीला गेले होते. आम्हाला सरकार तयार करायचे आहे. तुम्ही आमच्यासोबत हवे आहात. आमच्या गटात या असे त्यांना सांगितले. एका फोन कॉलवर ते गुवाहाटीला गेले. त्यांनी कोणताही सौदा केला नसल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले. इतर आमदारांनी सौदा केला असे मी म्हणत नाही. मात्र, माझ्या फोनवर फक्त बच्चू कडू गुवाहाटीला गेले होते असे फडणवीस यांनी आज स्पष्ट सांगितले.


मुंबई झालेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्याबाबतही प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी फडणवीस यांनी बच्चू कडू यांच्यावर असे आरोप लावणे चुकीचे असल्याचे सांगितले. जे गुवाहाटीला गेले. तर इतर आमदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास टाकून आले होते. आमदार अपात्रतेची कारवाई होऊ शकते असे असूनही शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून आमदार आले होते, असेही फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले. बच्चू कडू यांना आपण स्वत: फोन करून आम्ही सरकार तयार करणार असून तुम्ही आमच्यासोबत हवे आहात, असे सांगितले होते. त्यानंतर बच्चू कडू यांनी गुवाहाटी गाठले. त्यांच्यावर खोके घेतल्याचे आरोप करणे चुकीचे असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. 


रवी राणा आणि बच्चू कडू या दोघांनाही चर्चेसाठी रात्री बोलावले होते. या बैठकीत, आपण रागात वक्तव्य केले असल्याचे राणा यांनी म्हटले. तर, बच्चू कडू यांनीदेखील चुकून आपण राणा यांच्याविरोधात वक्तव्य केले असल्याचे म्हटले.  दोघांनीही आपली चूक मान्य केली आहे. दोन्ही आमदार विकासासाठी काम करणाार आहेत. आमच्या लेखी हा विषय संपला असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. 


दरम्यान, अमरावती जिल्ह्यातील अपक्ष आमदार रवी राणा  आणि बच्चू कडू यांच्यात सुरू असलेल्या वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आज सकाळी झालेल्या बैठकीनंतर रवी राणा यांनी बच्चू कडूंबाबत केलेल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली आहे. बच्चू कडू यांनीदेखील आक्षेपार्ह वक्तव्यावर माफी मागावी अशी मागणी रवी राणा यांनी केली आहे. 


आमदार रवी राणा यांनी माध्यमांसमोर दिलगिरी व्यक्त केल्यानंतर आमदार बच्चू कडू यांनीदेखील माध्यमांशी संवाद साधला. कडू यांनी म्हटले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली. त्यामुळे त्यांचे आभार मानतो. त्यानंतर कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याचे कडू यांनी म्हटले.


जे म्हणतात घेतले आहेत खोके, त्यांचे फिरले आहेत डोके; आठवलेंचा टोला 


जे म्हणतात घेतले आहेत खोके, त्यांचे फिरले आहेत डोके असा मिश्किल टोला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी लगावला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये आरपीआय महिला आघाडीची राष्ट्रीय बैठक पार पडली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना आठवलेंनी राहुल गांधींसह महाविकासआघाडीला लक्ष्य केलं. काँग्रेसचे नेते राहुल गांधींच्या 'भारत जोडो' यात्रेचा आगामी निवडणुकांवर काही परिणाम होणार नाही. उलट भाजपचे चारशे खासदार निवडून येतील आणि त्या केंद्रीय मंत्रिमंडळात ही मी मंत्री असेन, असं ठाम मत आठवलेंनी व्यक्त केलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची महायुतीला अजिबात आवश्यकता नाही. ते चांगले वक्ते आहेत, त्यांनी मोठ्या सभा घेत राहाव्यात आणि आम्ही सत्तेत येत राहावं. अशी मिश्किल टिपणी ही आठवलेंनी केली.