Amravati News अमरावती : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांची भाजपवर (BJP) उमेदवारी जवळपास निश्चित झाल्यासारखी आहे. मात्र उमेदवारी घोषित होण्याआधीच अमरावती (Amravati) जिल्ह्यात महायुतीत (Mahayuti) नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. आमदार रवी राणा यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर आता महायुतीमधील शिवसेनेकडून (शिंदे गट) कॅप्टन अभिजित अडसूळ (Abhijit Adsul), प्रहराचे आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) आणि भाजपचे नेते तुषार भारतीय(Tushar Bhartiya) यांनी राणा दाम्पत्यांवर जोरदार निशाणा साधला आहे.


एनडीएमध्ये असणारे सर्व नेते नवनीत राणा यांचा प्रचार करतील आणि त्यांना मी एका मंचावर आणेल आणि त्यांना नवनीत राणाचा प्रचार करावाच लागेल. असा इशारा रवी राणा यांनी दिल्यानंतर महायुतीमधील सगळेच पक्षाचे नेते चांगलेच आक्रमक झाले आहे. कॅप्टन अभिजित अडसूळ यांनी रवी राणाच्या वक्तव्याला मी भिक घालत नाही असं सांगितलं, तर आमदार बच्चू कडू यांनी तर मी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस पेक्षा मी रवी राणाला घाबरतो असा मिश्किल टोला लगावला. तर भाजपचे नेते तुषार भारतीय यांनी सांगितले की, रवी राणा हे वैफल्यग्रस्त झाले आहे. अशी टीका त्यांनी केलीय.


काय म्हणाले आमदार बच्चू कडू ? 


आमदार रवी राणा यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी आपल्या खास शैलीत मिश्किल प्रतिक्रिया देत राणा दाम्पत्यांची खिल्ली उडवली आहे. यावेळी बच्चू कडू म्हणाले की, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस पेक्षा मी रवी राणांना घाबरतो, सध्या खूप भीतीच वातावरण तयार झाला आहे. त्यांनी सांगितलं की मंचकावर राहावंच लागेल, मला कार्यकर्त्यांचे अनेक फोन आले, एवढी मोठी हस्ती काहीही करू शकते. उद्या आमच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो, चौकशी लागु शकते. अशी खोचक प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.


पुढे ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांना ते भेटून आल्यानंतर ते जोर जोराने बोलतात. त्यामुळे आम्हाला भीती आहे. आम्ही घाबरलेलो आहे. आमची इच्छा नसली तरी आम्हाला मंचावर जावं लागेल, प्रचार करावा लागेल,  आमची मोठी नामुष्की होईल. एकंदरीत ही फार कठीण झाले असल्याचेही बच्चू कडू म्हणाले.  


रवी राणा हे वैफल्यग्रस्त झालेत- तुषार भारतीय


आमदार रवी राणा यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर भाजपमधून देखील नाराजी व्यक्त केल्या जात आहे. यावर भाष्य करताना भाजप नेते तुषार भारतीय यांनी देखील रवी राणांचा खरपूस समाचार घेतला आहे. त्यावेळी ते म्हणाले की, आमदार रवी राणा यांनी महायुतीचा उमेदवार पडावा याबाबत सुपारी घेतली आहे का, असे सध्या वाटायला लागले आहे. कारण, आपल्या आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी अशा पद्धतीची भाषा कोणी करत नाही. मला याबाबतची खात्री आहे या वक्तव्याची माहिती महायुतीतील वरिष्ठ नेत्यांपर्यंत गेल्यावर ते याबाबत दखल घेतील. दुसरी बाब अशी की रवी राणांनी अशा पद्धतीने बोलणे आणि तेही महिलांच्या हळदीकुंकूंच्या कार्यक्रमाच्या वेळी, जिथे महिलामंडळ, आया-बहिणी उपस्थित असतात या ठिकाणी अशी मगरुरीची भाषा करणे हे योग्य नसल्याचे तुषार भारतीय म्हणाले


मला याची देखील खात्री आहे की रवी राणा हे वैफल्यग्रस्त झाले आहे. त्यामुळेच ते अशा पद्धतीचे वक्तव्य करत असतील. या व्यक्तव्यामधून महायुतीचा उमेदवार पाडणे हाच त्यामागील उद्देश असल्याचे देखील यावेळी स्पष्ट होत आहे. मात्र अशा पद्धतीने वक्तव्य करून उमेदवार निवडून येत नसतो असे देखील तुषार भारतीय म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या