Chandrakant Khaire : भाजपमध्ये (BJP) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Minister Nitin Gadkari) यांची भाजपमध्ये खूप मोठी घुसमट होत असल्याचा दावा शिवसेनेचे नेते ( ठाकरे गट) चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी केला आहे. त्यासंदर्भात गडकरी मला बोललेलं वाक्य मी कधीही सार्वजनिकरित्या बोलणार नाही, असं सूचक वक्तव्यही खैरेंनी केलं आहे. चंद्रकांत खैरे हे नागपूर दौऱ्यावर आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं. मात्र, त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.


 गडकरींना मंत्रिपदावरुन बाजूला जाण्याच्या चर्चा सुरु : खैरे


महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपसोबत संघर्षाच्या भूमिकेत असलेला ठाकरे गट आता भाजपमधील गडकरी-फडणवीस वादाला हवा देण्याच्या तयारीत आहे का? असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण ठाकरे नेते चंद्रकांत खैरे यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. संघ परिवार गडकरींच्या पाठीशी असल्यामुळं प्रकाश जावडेकरांच्या वेळेला गडकरींना मंत्रिपदावरुन बाजूला केलं गेलं नाही. मात्र, आता गडकरींच्या गोटातूनच अशी अफवा आहेत की गडकरींना बाजूला केले जाणार असल्याचे चंद्रकांत खैरे म्हणाले. भाजप श्रेष्ठींनी तसे केले तर योग्य होणार नाही. गडकरीसारख्या माणसाला बाजूला करणे चूक ठरेल असेही खैरे म्हणाले.


नितीन गडकरी मागे उद्धव ठाकरे यांना भेटले होते


भाजपमध्ये गडकरींना खरंच बाजूला केलं गेलं तर उद्धव ठाकरे आणि तुम्ही सर्व त्यांच्यासोबत उभे राहणार का?  या प्रश्नावरही खैरे यांनी सूचक वक्तव्य केले. नितीन गडकरी मागे उद्धव ठाकरे यांना भेटले होते. ते नेहमी भेटत राहतात असेही खैरे म्हणाले.   


एमआयएम भाजपची बी टीम


असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधातले सर्व मुस्लिम उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहेत. आम्ही एमआयएमच्या विरोधात असून आम्ही का त्यांच्याकडे जाणार असेही खैरे म्हणाले. एमआयएम भाजपची बी टीम असल्याचे खैरे म्हणाले.  मुंब्र्यात सर्व मुस्लिम हे जितेंद्र आव्हाड यांच्या बाजूने आहेत. मी मुंब्र्यात भरपूर कामे केले असून मला मुंब्र्यातील परिस्थिती माहीत आहे. त्यामुळं ओवेसीच्या बोलण्याने काहीच होणार नाही असंही खैरे म्हणाले. 


16 आमदार अपात्र ठरले की त्यांची काय अवस्था होते हे पहा 


आमचे देवाला साकडं आहे की, कोणत्याही स्थितीत उद्धव ठाकरे यांना सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळू दे. एकदा 16 आमदार अपात्र ठरले की त्यांची काय अवस्था होते हे पहा असेही खैरे म्हणाले. एकनाथ शिंदे हे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत. ते आनंद दिघे यांचं नाव घेतात. मात्र, आनंद दिघे यांनी असे कधीही केले नाही असे खैरे म्हणाले. आनंद दिघे गेल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याशी गोड बोलून जवळीक साधल्याचे खैरे म्हणाले.


निवडणूक आयोगाने आमच्यासोबत दगा केला


निवडणूक आयोगाने आमच्यासोबत दगा केला आहे. रामविलास पासवान यांच्या पक्षात वाद निर्माण झाल्यानंतर निवडणूक आयोगाने दोन वर्ष त्याबद्दल काहीच केले नाही. शिवसेनेच्या प्रकरणात मात्र त्यांनी तातडीने निर्णय घेतल्याचे आरोपही खैरेंनी केला. शिव गर्जना यात्रेच्या निमित्ताने चंद्रकांत खैरे नागपूरला आले होते, त्यावेळी ते बोलत होते.


महत्त्वाच्या बातम्या:


Nitin Gadkari : बुलढाणा पॅटर्न देशात गेला, नदी नाल्यांच्या खोलीकरणामुळं मोठ्या प्रमाणात पाणी जमिनीत मुरलं : गडकरी