सोलापूर Rohit Pawar :  दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम सध्याच्या सरकारमधील काही लोकं करत आहेत. राज्यात ओबीसी-मराठा (Maratha -OBC) वाद निर्माण करत आहेत. पण त्यामुळे सोयाबीनचे भाव वाढतात का? लाडकी बहीण योजनेला विरोध नाही, पण लोकांना नोकऱ्या मिळाल्या आणि पाहिली पगार आली तर किती आनंद होईल. इथे दडपशाही खूप आहे हे आम्हाला माहिती आहे. केजीएफ चित्रपटामध्ये दाखवलेल्या गुंडाला कायम वाटतं की सगळं काही माझंच असावं. खोट्या केसेस इथे होत आहेत. तुम्ही अशा केसेस आणि पोलिसांना घाबरणार का? पुढे आमचे सरकार आहे, तुम्ही खोटे गुन्हे दखाल केले की गाठ आमच्याशी आहे हे लक्षात ठेवा. असा थेट इशारा देत राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाचे नेते आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. ते बार्शी येथे बोलत होते. 


अजित दादा तुम्ही टोपी घाला, गॉगल घाला काहीही करा पण शेतकऱ्यांचा प्रश्न मांडा


बार्शी आणि या भागात सोयाबीनची शेती मोठ्या प्रमाणात आहे. सोयाबीनचे आजचे भाव परवडणारे नाहीत. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे खतचे भाव आज वाढलेत. मात्र जे भाव पाच वर्षांपूर्वी होते तेच भाव कायम होते. विधानसभेमध्ये जेव्हा आम्ही हा प्रश्न मांडतो तेव्हा त्याचे उत्तर आम्हाला मिळत नाही. मोदी, फडणवीस म्हणाले होते उत्पन्न दुप्पट करू.  पण यांनी खर्च दुप्पट केला, पण भाव वाढले नाहीत.


पवार साहेब कृषी मंत्री असताना लोकं फोन करायचे की कांद्याचे भाव पडलेत. पवार साहेब तात्काळ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत होते. मात्र हल्लीच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा शेतकऱ्यांना पाच हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. अजित दादा तुम्ही सत्तेत आहात आणि कांद्याच्या बाबतीत सरकारचा निर्णय चुकला असताना तुम्ही टोपी घाला, गॉगल घाला काहीही करा पण शेतकऱ्यांचा प्रश्न मांडा.असेही  आमदार रोहित पवार म्हणाले.


दोन महिन्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार येणार 


दोन महिन्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार येणार म्हणजे येणार असल्याचे रोहित पवार म्हणाले. कोणत्याही योजना बंद होणार नाहीत, योजनांची व्याप्ती आपण वाढवणार असल्याचे रोहित पवार म्हणाले. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माढा लोकसभेचे नूतन खासदार धैर्यशील भैय्या मोहिते पाटील, कर्जत जामखेडचे आमदार रोहीत दादा पवार यांच्या उपस्थितीत शरद शेतकरी संवाद मेळाव्याच आयोजन केलं आहे. यावेळी रोहित पवार बोलत होते. 


 इतर महत्वाच्या बातम्या