मुंबई : आज राजकारणाच्या माध्यमातून छोटे पद मिळवणारे राजकीय कार्यकर्तेही कोट्यवधींच्या बंगल्यात राहताना आपण पाहतो. मंत्र्यांच्या बंगल्यांचा तर विषयचं वेगळा आहे. सरकारमधील मंत्र्यांना दिलेल्या बंगल्यांवर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. राज्यात निधीअभावी अनेक महत्वाच्या गोष्टी रखडल्या आहेत. अशा परिस्थितीत ही उधळपट्टी योग्य आहे का? हा वादाचा मुद्दा आहे. पण, राजकारणात आलेले सगळेच असं करतात असं नाहीय. याचं ताजं उदाहरण समोर आलं आहे.
उर्जामंत्री नितीन राऊत यांच्या अलीशान बंगल्याचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. पैसे थकीत राहिल्याने शेतकऱ्यांची वीज तोडता मग मंत्र्यांच्या बंगल्यावर कोट्यवधीचा खर्च कशासाठी करता असा प्रश्न उपस्थित करत भाजपने राज्य सरकार आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर टीका केली होती.
यावर माझा जन्म जरी गरीब घरात झाला तरी मी पायलट होतो. त्यावेळीही मी खर्च करु शकत असल्याने असाच रहायचो. मला चांगलं राहायला आवडतं. आताही मी नियमबाह्य कोणतीही गोष्ट केली नाही असं सांगत नितीन राऊत म्हणाले की, "सार्वजनिक बांधकाम विभाग नियमांच्या अधिन राहून जे काम करत, ते काम सुरू आहे. लोकांना जे समजायचं ते समजावं. माझं किचन बघा हे लॅविश आहे का? माणसाने लॅविश राहू नये का? लोकांना वाटतं मी ऊर्जा खात्यात काम करतो, ते लोकांना सलत आहे त्यामुळे त्यांना तिरस्कार वाटतो, त्यांच्या पोटात जळत आहे.", अशी प्रतिक्रिया नितीन राऊत यांनी दिली.
माजी मंत्री राहतोय पत्र्याच्या घरात
दुसरीकडे 5 वर्ष उत्तरप्रदेश सारख्या राज्यात मंत्रिपद भूषविणारे, मंत्री असताना आपल्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या माध्यमातून कोट्यवधींचा निधी विविध कामांसाठी देणारे यशवंत निकोसे आज पत्र्याच्या घरात राहत आहेत.
यशवंत निकोसे. बहुजन समाज पक्षाचे खंदे कार्यकर्ते. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे विद्यार्थी. युवा अवस्थेत कांशीराम यांच्यापासून प्रभावित झाल्यानंतर यशवंत निकोसे यांनी घरदार, नोकरी आणि कला-नाट्य क्षेत्रातील त्यांचं करिअर सर्व काही त्यागून बहुजन समाज पक्षासाठी काम सुरु केलं होता. कांशीराम यांच्या विचारांप्रती त्यांची निष्ठा पाहूनच मायावती यांनी आधी यशवंत निकोसे यांना राज्यपाल नियुक्त आमदार बनविले आणि नंतर स्वतःच्या मंत्रिमंडळात यशवंत निकोसे यांना सांस्कृतिक विभागाची स्वतंत्र जबाबदारी सोपविली होती.
2007 ते 2012 दरम्यान निकोसे यांनी उत्तर प्रदेशात मंत्रिपदाची जबाबदारी पार पाडली. कांशीराम यांच्या नंतर हळूहळू बसपाचा चेहरामोहरा बदलत गेल्यामुळे 2017 पासून निकोसे नागपुरात परत आले. 35 वर्षांपूर्वी नागपूरच्या गड्डीगोदाम परिसरात एका झोपडपट्टीत राहणाऱ्या निकोसे यांनी त्याच सोडलेल्या मोडक्या घरात आपलं जीवन पुन्हा सुरु केला. समोर अविवाहित भावाची चॉकलेट बिस्किटांची लहानशी दुकान आणि त्यामागे टिनाच्या शेडमधील मोडकळीस आलेलं घर आहे. काही महिन्यांपूर्वी या परिसरात नागपूर महापालिकेने गल्लीतील रस्त्याचे काँक्रीटीकरण केले. त्यात निकोसे यांच्या घराची सीवर लाईन तुटली. हळूहळू निकोसे यांच्या घरात आणि स्वच्छता घरात घाण पाणी तुंबू लागले. मलमूत्राच्या दुर्गंधीमुळे घरात राहणे कठीण होऊन गेले. अवघ्या तीस फुटाच्या सीवर/गडर लाईनसाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी एका माजी मंत्र्याला जेरीस आणलं आहे.