Shiv Sena Symbol : उद्धव ठाकरे गट (Uddhav Thackeray) आणि शिंदे गटातील (Eknath Shinde) लढाईत दोन्ही गटाला निवडणूक आयोगानं (Election Commission)दणका दिला आहे. शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण (Shivsena Election Symbol Bow And Arrow) गोठवण्यात आलं आहे. शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटांना हे चिन्ह वापरता येणार नाही. निवडणूक आयोगाने शिवसेना नाव वापरण्यासह धनुष्यबाण चिन्ह हे अंधेरी पोटनिवडणुकीसाठी तात्पुरते गोठविण्याचा निर्णय दिल्यानंतर यातील कायदेशीर बाबी काय? यावर विशेष सरकारी वकील उज्जवल निकम (Ujjwal Nikam)यांनी प्रतिक्रिया दिली आहे.


निवडणूक आयोगाचा हा अंतिम निर्णय नाही -  उज्ज्वल निकम 


राज्य निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष व त्याच्या चिन्हाबाबत दिलेल्या निर्णयावर राज्याचे विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोगाचा हा अंतिम निर्णय नाही, दोन्ही पक्षांकडून पुरावे सादर करणे, लागणारा युक्तिवाद या गोष्टीना बराच कालावधी लागू शकतो, त्यामुळे अंधेरी विधानसभेची पोटनिवडणूक लक्षात घेता, निवडणूक आयोगाने हे तात्पुरते आदेश पारित केले असल्याचं उज्ज्वल निकम म्हणाले.


"..तर दोन्ही गटांना सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येऊ शकते"
उज्ज्वल निकम पुढे म्हणाले, या निर्णयाविरुद्ध दोन्ही गटांना सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येऊ शकते, दोन्ही गटांना अंधेरी विधानसभेच्या निवडणुकीसाठी तर उमेदवार उभे करावयाचे असतील तर ते निवडणूक आयोगाच्या निकालाला दोन्ही गट आव्हान देऊ शकतात, शिवसेना पक्ष व त्याचे चिन्ह याबाबत निकाल देण्यास निवडणूक आयोगाला वेळ लागू शकतो. साधारणपणे सहा महिन्यात निवडणूक आयोगाकडून निकालाने अपेक्षित असतं , निवडणूक आयोगापुढे दोन्ही गटाकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलेले आहेत. आता तोंडी पुरावा काय सादर केला जातो या दोन्ही गोष्टी लक्षात घेता निवडणूक आयोगाचा निकाल तसेच शिवसेना पक्ष व त्याचे चिन्ह याबाबत भवितव्य हे ठरेल असेही यावेळी उज्वल निकम यांनी सांगितले.


शिवसेना नावच वापरता येणार नाही का? उज्ज्वल निकम म्हणाले...


शिवसेना नावच वापरता येणार नाही का? याबाबत यापूर्वीच अशा प्रकारांमध्ये दिलेले निकाल अभ्यासावे लागतील तसेच शिवसेना नावाच्या पुढे आणि मागे काहीतरी शब्द घालून ते दोन्ही गटांना वापरता येऊ शकतं असं मतही यावेळी उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केलं. सोमवारपर्यंत दोन्ही गटांना त्यांची मान्यता चिन्ह कोणती आहेत? याची निवड करावी लागेल असेही यावेळी उज्ज्वल निकम म्हणाले.


नव्या चिन्हासाठी सोमवारी आयोगाला पर्याय द्यायचे आहेत


दरम्यान हा निर्णय तात्पुरत्या स्वरुपाचा असल्याची माहिती आहे. केवळ अंधेरी पोटनिवडणुकीकरता हा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. 10 ऑक्टोबरपर्यंत नव्या चिन्हासाठी दावा करण्याचे निर्देशही आयोगाकडून देण्यात आले आहेत. शिवसेना पक्षाचे नाव देखील या दोन्ही गटांना वापरता येणार नाही. नव्या चिन्हासाठी सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत आयोगाला पर्याय द्यायचे आहेत, अशी माहिती मिळाली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Shiv Sena Symbol: 'धनुष्यबाण' कुणालाच नाही! शिवसेना नावही वापरायचं नाही; आता ठाकरे अन् शिंदेंसमोर पर्याय काय?