Central Railway Megablock : मुंबईकरांनो आज रविवारी लोकल रेल्वेने (Central Railway Megablock Today) प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेकडून आज मेगाब्लॉक (Megablock) घेण्यात येत आहे. देखभालीचे काम करण्यासाठी आज उपनगरीय विभागांत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे-कल्याण स्थानकांदरम्यानच्या दोन्ही जलद मार्गावर तसेच हार्बरच्या कुर्ला - वाशीदरम्यानच्या दोन्ही मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे लोकल विलंबाने धावतील. अशी माहिती रेल्वे प्रशासनाने (Railway) दिली.
'या' मार्गांवर मेगाब्लॉक
ठाणे-कल्याण अप आणि डाऊन तसेच जलद मार्गावर सकाळी 10.40 ते दुपारी 3.40 पर्यंत हा ब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून सकाळी 9.30 ते दुपारी 2.45 वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन-जलद सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. तसेच त्यांच्या थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबतील आणि निर्धारित वेळेपेक्षा 10 मिनिटे उशिराने स्थानकावर पोहोचतील.
कल्याण येथून सकाळी 10.28 ते दुपारी 3.25 पर्यंत सुटणाऱ्या अप जलद/अर्ध जलद लोकल सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवल्या जाणार आहेत. तर या लोकल दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवर थांबतील. त्यानंतर मुलुंड येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि निश्चित स्थानकावर 10 मिनिटे उशिरा पोहोचतील.
'या' लोकल सेवा रद्द
तर कुर्ला-वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येत असून पनवेल-बेलापूर-वाशी येथून सकाळी 10.34 ते दुपारी 3.36 या वेळेत सुटून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणारी हार्बर मार्गावरील सेवा आणि वाशी-बेलापूर-पनवेल येथून सकाळी 10.16 ते दुपारी 3.47 वाजेपर्यंत सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
रेल्वे प्रशासनाकडून दिलगीरी
ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कुर्ला आणि वाशी-पनवेल स्थानकांदरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. तर हार्बर मार्गावरील प्रवाशांना ट्रान्सहार्बर मार्गे (ठाणे-वाशी/नेरुळ) सकाळी 10.00 ते संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी असेल. हा मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक असल्याने प्रवाशांना होणार्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे. असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.