Pravin Darekar : मुंबई बँक गैरव्यवहार प्रकरणी भाजपा नेते आणि विधानपरिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर आणि इतर दोन आरोपींच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या आरोपपत्रात इतर दोघांच्या नावाचाही समावेश असल्याची माहिती मिळत आहे. प्रवीण दरेकरांविरोधात तब्बल 904 पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
904 पानी आरोपपत्रात कोणते कलम लावण्यात आले?
या आरोपपत्रात प्रवीण दरेकर यांच्यासोबतच प्रवीण मर्गज आणि श्रीकांत कदम या दोघांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. मुंबई बँक कथित मजूर प्रकरणात बेलार्ड पियर मेट्रोपोलिटन कोर्टात मुंबई पोलिसांकडून शुक्रवारी हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. एकूण 904 पानी आरोपपत्रात तिन्ही आरोपींविरोधात आयपीसी कलम 199 , 200, 406, 417, 420, 465 ,468 , 471 आणि 120 -ब अंतर्गत आरोप दाखल करण्यात आले आहेत.
एकूण 29 साक्षीदारांची साक्ष
या प्रकरणी मुंबई पोलिसांनी एकूण 29 साक्षीदारांची साक्ष नोंदवली आहे. त्यात 3 पोलीस अधिकारी, एक डेप्युटी कलेक्टर, काही शासकीय अधिकारी तर काही मुंबई बँकेतील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. दरम्यान, आम आदमी पक्षाचे नेते धनंजय शिंदे यांनी दरेकर यांच्या विरोधात एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
काय आरोप?
दरम्यान, मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी दरेकर यांनी बँकेच्या निवडणुकीत बोगस कागदपत्रे देऊन उमेदवारी दाखल केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. तसेच आरोपपत्रात भाजपचे प्रवीण मारगज आणि श्रीकांत कदम यांचाही उल्लेख आहे. एमआरए मार्ग पोलिसांनी आज 904 पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. यामध्ये 29 साक्षीदारांची यादी असून पोलिस आणि काही शासकीय अधिकारी आहेत. तसेच बँकेचे काही कर्मचारीदेखील आहेत. आम आदमी पार्टीचे नेते धनंजय कापसे यांनी दरेकर यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. सन 1997 मध्ये प्रतिज्ञा सहकारी सोसायटीच्या सदस्य म्हणून त्यांनी मजूर नोंदणी केली होती. त्यानंतर त्यांनी दहा वर्षे बँकेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. आमदार म्हणून निवडून आल्यावर देखील त्यांनी ही नोंद कायम ठेवली होती, असा आरोप करण्यात आला होता.