NCP : अवघ्या दोन महिन्याआधी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या हस्ते नागपुरात अल्पसंख्यांक समाजाचा तरुण चेहरा म्हणून ज्या 'गुलाम अश्रफी'ने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. दरम्यान, आता पोलिसांच्या अटकेत असलेल्या त्याच गुलाम अश्रफीचे अत्यंत खळबळजनक आणि लाजिरवाणे कारनामे पोलिसांच्या तपासात बाहेर येत आहे. गुलाम अश्रफी याने वाहन विक्रीच्या क्षेत्रात नावाजलेल्या टाटा फायनान्स कंपनीला तब्बल साडे तीन कोटी रुपयांचा चुना लावल्याचे समोर आले आहे.
कोट्यवधींचे अनेक गौडबंगाल समोर
31 मे रोजी नागपूर पोलिसांनी गुलाम अश्रफ़ीला यादवनगर भागातून अटक केली होती. त्याच्यावर काही गरीब टॅक्सी चालकांच्या तसेच बँक ऑफ महाराष्ट्राच्या फसवणूकीचा आरोप होता. मात्र, आता पोलीस तपासात गुलाम अश्रफीचे कोट्यवधींचे इतर अनेक गौडबंगाल समोर येऊ लागले आहे. गुलाम अश्रफी टाटा फायनान्स आणि इतर वित्तीय संस्थांच्या कर्जावर वाहन खरेदी करणाऱ्या लोकांची यादी मिळवायचा आणि त्यांना सहा महिन्यानंतर वाहनाचे हफ्ते भरू नका असे सांगायचा. त्यानंतर हफ्ते न भरणाऱ्या वाहन मालकाला तो स्वतःच्या "यंग फोर्स" या संघटनेचा खास स्टिकर द्यायचा. ते स्टिकर वाहनावर लावले की फायनान्स कंपनी किंवा बँकेचे लोकं तुम्हाला त्रास देणार नाही आणि वाहन ही जप्त करणार नाही, त्यांना माझे लोकं ( गुंड ) सांभाळून घेतील असे सांगायचा.
फसवणुकीचे नवनवीन कारनामे बाहेर
कर्ज घेतलेले वाहन चालक त्याच्या अमिषाला बळी पडायचे आणि कर्जाचे नियमित हफ्ते देणे बंद करायचे. गुलाम अश्रफीचे गुंड काही महिने बँकांच्या वसुली पथकापासून संरक्षण द्यायचे. त्यानंतर गुलाम अश्रफीचेच गुंड बँका किंवा वित्तीय संस्थेचा नाव सांगून संबंधित वाहन जप्त करून उचलून न्यायचे. पोलिसांकडे आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार गुलाम अश्रफीने अशाच पद्धतीने टाटा फायनान्स कंपनीला साडे तीन कोटींचा चुना लावला आहे. शिवाय बँक ऑफ महाराष्ट्राची ही अनेक कोटींची फसवणूक केली आहे. गुलाम अश्रफीने अशाच पद्धतीने अनेक ट्रक्स, जेसीबी, फॉर्च्युनर सारख्या महागड्या गाड्या आणि अनेक मालवाहतूक वाहन गरिबांकडून हिसकावल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. नागपूर पोलिसांकडे गुलाम अश्रफी विरोधातल्या तक्रारींचा ओघ वाढला असून रोज त्याचे फसवणुकीचे नवनवीन कारनामे बाहेर येत आहे. त्यामुळे ज्यांना ज्यांना त्याने त्रास दिले आहे त्यांनी निर्धास्तपणे समोर येऊन तक्रार करावी असे आवाहन नागपूर पोलिसांनी केले आहे.