Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं झाडांवर किती प्रेम आहे ते आपल्या सर्वांना माहीत आहे. झाडांवरील प्रेम अजित पवारांनी अनेकदा भाषणात बोलून देखील दाखवले आहे. अजित पवार यांचा ज्या ठिकाणी त्यांच्या संस्था आहेत त्या ठिकाणी जास्तीत जास्त झाडे लावण्याचा त्यांचा आग्रह असतो. परंतु याचाच विसर काहींना पडला आणि थेट त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अजित पवार यांच्या बारामतीतील सहयोग सोसायटीच्या कंपाऊंड वॉलच्या बाहेर आलेल्या फांद्या तोडल्या कारणावरून 2 जणांविरुद्ध बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 


2 जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात फिर्याद
या प्रकरणी संतोष वाबळे यांनी वृक्षांच्या फांद्यांची तोड केल्याप्रकरणी 2 जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिलेल्या माहितीनुसार 2 दिवसापूर्वी अजित पवारांच्या सहयोग सोसायटी या निवासस्थानी कंपाऊंडच्या आत असलेल्या झाडांच्या फांद्या या कंपाऊंड बाहेर आलेल्या होत्या. फांद्या तोडणी सुरू असल्याचे संतोष वाबळे यांच्या ध्यानात येताच त्यांनी कुणाच्या परवानगीने झाडं तोडत आहात असे विचारलं असता त्यांनी दिलीप जगदाळे यांच्या सांगण्यावरून तोडत आहे असं सांगितले. 


फायकस जातीच्या झाडाच्या 20 ते 25 फांद्या तोडलेल्या दिसल्या


यावेळी त्यांच्याकडे झाडे तोडण्याचा परवाना आहे किंवा परवानगी आहे का? असे विचारले.  परंतु झाडे तोडणाऱ्या कडे परवानगी नव्हती. तसेच काहीजण हे फांद्या घेऊन जाताना दिसले. त्यावेळी झाडे तोडण्याऱ्यांनी तोपर्यंत फायकस जातीच्या झाडाच्या 20 ते 25 फांद्या तोडलेल्या दिसल्या. त्यावरून संतोष वाबळे यांनी पांडुरंग माने आणि दिलीप जगदाळे यांच्या विरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता बारामती शहर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. बारामती शहर पोलिसांनी चोरीचा तसेच महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम 1975 चे कलम 21 अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.