मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.


राहुल गांधींची आजही चौकशी शक्य
नॅशनल हेराल्ड प्रकरणी राहुल गांधींची ईडीकडून चौकशी सुरू आहे. त्यांची आजही चौकशी होण्याची शक्यता आहे. ईडीने समन्स पाठवल्यानंतर राहुल गांधी 13 जूनला पहिल्यांदा चौकशीला समोर गेले. त्यानंतर सगल तीन दिवस राहुल गांधीची चौकशी झाली. पहिल्या दिवशी 50 प्रश्न, दुसऱ्या दिवशी 36 प्रश्न आणि तिसऱ्या दिवशी साधारण 24 प्रश्न विचारल्याची माहिती आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरण 2012 मध्ये प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यानंतर भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्रायल कोर्टात याचिका दाखल केली.  दिल्लीतील बहादूर शाह जफर मार्गावर असलेल्या हेरॉल्ड हाऊसच्या 2000 कोटी रुपयांच्या इमारतीवर कब्जा करण्यासाठी हे सर्व केल्याचा आरोप स्वामींनी केला.


नवाब मलिक आणि अनिल देशमुखांच्या याचिकेवर आज सुनावणी
नवाब मलिक आणि अनिल देशमुखांना विधान परिषदेत मतदानाची परवानगी मिळणार की नाही यावर आज हायकोर्टात आज एकत्रित सुनावणी होणार आहे. 20 जूनला होणाऱ्या विधान परिषदेच्या मतदानासाठी परवानगीसाठी देशमुख आणि मलिकांची हायकोर्टात याचिका सादर केली आहे. 
 
देशातील पहिली खासगी ट्रेन आज शिर्डीत पोहोचणार
देशातील पहिली खाजगी ट्रेन आज शिर्डीत पोहचणार आहे. भारत गौरव योजनेंतर्गत देशातील पहिल्या खासगी रेल्वे सेवेला मंगळवारी कोईम्बतूर येथून हिरवा झेंडा दाखवण्यात आला होता. ही ट्रेन आज शिर्डीत पोहचणार आहे. या स्पेशल ट्रेनमध्ये 1500 लोक प्रवास करू शकतात. दक्षिण रेल्वेचे सीपीआरओ बी गुग्नेसन यांनी ही माहिती दिली आहे. न्यूज एजन्सी एएनआयच्या रिपोर्टनुसार रेल्वेने ही ट्रेन एका सर्व्हिस प्रोव्हायडरला दोन वर्षांसाठी लीजवर दिली आहे.