मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक वेगवान घडामोडी घडत आहेत. या घडामोडींमध्ये अनेक मुद्द्यांनी लक्ष वेधून घेतले आहे. या सर्व घडामोडींमध्ये एक नवीन चेहरा देखील समोर आला आहे, तो म्हणजे शिवसेना नेत्या दीपाली भोसले- सय्यद (Deepali Syed ). दीपाली सय्यद यांच्या सय्यद या आडनावाचीच सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. आडनावापासून ते राजकारणापर्यंतच्या अनेक प्रश्नांची उत्तरं त्यांनी एबीपी माझासोबत बोलताना उलघडली आहेत.  


सिनेसृष्टीतून लोकप्रिय झालेला चेहरा राजकारणात सक्रीय होतो त्यावेळी आपसूकच त्यांनी केलेली वक्तव्य काळजीपूर्वक ऐकली जातात. दीपाली सय्यद यांनी अभिनय क्षेत्रातून राजकारणात प्रवेश केला.  त्यांच्या राजकीय प्रवेशापासून ते आडनावापर्यंत त्या कायमच चर्चेत राहिल्या आहेत. दीपाली भोसले ते  दीपाली सय्यद हे आडनाव बदलण्यामागचं नेमकं कारण काय यावर आजवर अनेक चर्चा होत आल्या. पक्षांप्रमाणे आणि निवडणुकांमुळे वेळोवेळी त्यांनी आडनाव बदललं असे देखील तर्क लावण्यात आले. पण यामागचं तत्थ्य काय? म्हणजे आधी दीपली भोसले आणि नंतर दीपाली सय्यद असं का? हे स्वतः दीपाली सय्यद यांनीच सांगितलंय. 


मुंबईत जन्म 


मुंबईच्या कुर्ल्यात जन्म घेतलेली मराठमोळी अभिनेत्री दीपाली भोसले. दीपाली भोसलेंचं संपूर्ण बालपण  मुंबईत गेलंय. दीपाली यांनी नालंदा विद्यापिठातून फाइन आर्टसची पदवी घेतली. त्यानंतर त्यांच्या करियरची सुरुवात ही अभिनय क्षेत्रातून झाली. अभिनय क्षेत्रातलं त्यांचं पदार्पन मराठी मालिकांमधून झालं. मराठी कलाविश्वात त्यांना खरा ब्रेक मिळाला ते बंदीनी आणि समांतर या मराठी मालिकांमधून. त्यानंतर त्यांचा प्रवास सुरु झाला तो मराठी चित्रपट, मालिका, टीव्ही शोज, जाहीरात क्षेत्रांपर्यंत. या सगळ्यातून दीपाली या खऱ्या अर्थाने लोकप्रियता केव्हा मिळाली तर ती जत्रा चित्रपटातल्या ये गो ये मैना या गाण्यानंतर. या गाण्यातून दीपाली या घराघरात पोहचल्या. 


...म्हणून राजकारणात प्रवेश 


दीपाली यांच्याबाबतचा सर्वसामान्यांना पडणारा प्रश्न म्हणजे मराठी सिनेसृष्टीतून दिपाली यांनी राजकारणात येण्याचं कारण काय? याबाबत बोलताना त्या सांगतात, "मला सामाजिक कार्य करण्याची आवड आहे. लोकांचे अनेक प्रश्न आहेत, समस्या आहेत. त्या समस्या मी माझ्या परीने सोडवू शकले तर मला आनंद मिळेल. एक अभिनेत्री म्हणून मला काही मर्यादा आहेत. त्यामुळे सामान्यांच्या सगळ्याच प्रश्नांना तेवढा न्याय देऊ शकेन असं वाटलं नाही. त्यामुळे राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. 


"राजकारणात आले तर सामान्यांचे आणि महिलांचे प्रश्न सोडवता येतील. शिवाय महिलांचे जास्तीत जास्त प्रश्न मांडून समाजात बदल घडवून आणता येईल असं वाटलं. समाजात महिला अजूनही सुरक्षित नाहीत. मी स्वतः राजकारणात असून माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोललं जातं, आडनावाबद्दल बोललं जातं. तर सामान्य महिलांचं काय? त्यांच्या सुरक्षेचं काय? याच सगळ्या प्रश्नांवर काम करता यावं यासाठी मी राजकारणात प्रवेश केला, असं दीपाली यांनी सांगितलं. 


कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही 


अभिनय क्षेत्रातून राजकारणात येत असताना दीपाली सय्यद यांची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती.  2014 ला राजकारणात नवख्या असलेल्या दीपाली यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला. त्यावेळी  आम आदमी पक्षाची महाराष्ट्रात फारशी चर्चा नव्हती. 2014 लाच त्यांनी आपकडून विधानसभेची निवडणूक लढवली. परंतु, या पहिल्याच निवडणुकीत  त्यांचा पराभव झाला. त्यानंतर दीपाली यांनी शिवसंग्राम या पक्षात प्रवेश केला. त्यावेळी देखील त्या जास्त चर्चेत नव्हत्या. 


शिवसेनेत प्रवेश
दीपाली सय्यद राजकारणात खऱ्या चर्चेत आल्या ते  2019 मध्ये.  2019 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून हातावर शिवबंधन बांधून घेतले. 3 ऑक्टोबर 2019 या दिवशी त्यांचा शिवसेनेत प्रवेश झाला.  त्यानंतर लगेच झालेलेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना ठाण्यातील कळवा मुंब्रामधून राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात उमेदवारी मिळाली. पण जितेंद्र आव्हाड यांच्याकडून दीपाली सय्यद पराभूत झाल्या. त्यावेळी देखील या नावाची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली.  


भोसले ते सय्यद प्रवास कसा झाला?
 
सय्यद या आडनावाबाबत सांगताना दीपाली म्हणाल्या, "एखाद्या मुलीचं लग्नानंतर आडनाव बदलतं, अगदी तसंच माझं आडनाव बदलंलय. लग्नापूर्वी दीपाली भोसले असं नाव होतं. परंतु, लग्नानंतर दीपाली सय्यद असं झालं. म्हणजेच त्यांच्या पतीचं आडनाव त्यांच्या नावापुढे लागलं. दीपाली सय्यद यांचं लग्न सन 1998 मध्ये झालं. त्यांना 22 वर्षाचा एक मुलगा असून तो सिडनीत आपलं शिक्षण घेत आहे.  


सोईनुसार नावाचा आणि धर्माचा वापर करत असल्याचा आरोप
दीपाली यांच्या सोफिया या नावाची देखील सतत चर्चा होत असते. कारण 2019 च्या निवडणुकीत दीपाली सय्यद यांनी 'सोफिया जहांगीर सय्यद' या नावाने होर्डिंग्ज लावून प्रचार केला होता. त्यामुळे सोईनुसार नावाचा आणि धर्माचा वापर करत असल्याची टीका त्यांच्यावर झाली होती. "सोफीया हे नाव लग्नानंतर  पतीने प्रेमाने ठेवलंय. त्यामागे कोणतंही राजकारण नाही. भारतीय संस्कृतीत लग्नानंतर मुलीचं इच्छेप्रमाणे जसं नाव बदललं जातं अगदी तसच सोफिया हे नाव ठेवलं आहे, असे दीपाली यांनी सांगितले.  


पूरग्रस्तांना मदत 
कोल्हापूर आणि सांगलीत 2019 ला आलेल्या महापुरावेळी दीपाली सय्यद यांनी पूरग्रस्त कुटुंबातील मुलींच्या मदतीसाठी पुढाकार घेतला होता. पूरग्रस्त कुटुंबातील मुलींसाठी दीपाली सय्यद यांनी पाच कोटी रुपयांचा निधी दिला होता.  शिवाय कोल्हापुरातील पूरस्थितीची पाहणी करुन त्यावेळी त्यांनी पूरग्रस्तांसाठी 10 कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती. या मदतीची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा झाली होती.