Nitin Gadkari On Tree Plantation : देशाच्या लोकसंख्याएवढे वृक्षारोपण करण्याचा निर्धार केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. त्यांच्या विभागाच्या अखत्यारीत काम करणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून देशातील महामार्गांच्या दोन्ही बाजूला ही वृक्ष लागवड केली जाणार अशी माहिती आज गडकरींनी दिली. हे लक्ष जरी कठीण असले तरी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ते पूर्ण करून दाखवेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आज राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून देशातील शंभर ठिकाणी वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेण्यात आले. प्रत्येक ठिकाणी एक हजार याप्रमाणे आजच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने देशभरात एक लाख वृक्षांचे रोपण केले. 


नागपुरात झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशाच्या लोकसंख्ये एवढे वृक्ष लागवडीचे टार्गेट राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिल्याची माहिती दिली. देशात दर्जेदार महामार्ग निर्माण करणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची प्रतिमा वृक्ष तोडणारे अशीच समाजात निर्माण होऊ नये. तर महामार्ग प्राधिकरण वृक्ष लागवड करते आणि त्याची जपणूक ही करते अशी असावी म्हणून प्राधिकरणाने देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत वृक्षारोपण करावे अशी इच्छा गडकरी यांनी व्यक्त केली.


राष्‍ट्रीय महामार्ग प्राधीकरणच्‍या वतीने एलआयटी माजी विद्यार्थी संघटना (लिटा) यासह विविध शासकीय विभागाच्या सहकार्याने ‘हरित पर्यावरण चळवळ (जीइएम)’ या महावृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन करण्‍यात आले आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्‍या अमृत महोत्‍सवाचा एक भाग म्‍हणून सुरू करण्‍यात आलेल्या मोहिमेत आज एका दिवसात 100 ठिकाणी प्रत्येकी 1 हजार वृक्षाचे रोपण करून चळवळीचे उद्घाटन करण्यात आले. नागपुरातील एलआयटी परिसरात केंद्रीय नितीन गडकरी यांच्‍या उपस्थित मुख्य सोहळा पार पडला. ऑक्‍सीजन उत्‍सर्जिंत करणा-या या झाडांमुळे भविष्यात एलआयटीचा परिसर लवकरच ‘ऑक्‍सीजन पार्क’ होईल, असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्‍यक्‍त केला. 






दरम्यान शाळा आणि महाविद्यालयांनीही एनएसएस आणि एनसीसीमधील विद्यार्थी शक्तीचा वापर करून शाळा आणि महाविद्यालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम हाती घ्यावी तसेच फक्त वृक्षारोपण करून न थांबता प्रत्येक विद्यार्थ्याला एक एक वृक्षाच्या संगोपनाची जबाबदारी ही द्यावी असेही गडकरी यांनी सुचवले. 


देशभरात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण केवळ रस्त्यावर झाडे तोडण्याचे काम करतात असा समज निर्माण झाला. पण केंद्रीय मंत्री गडकरी यांनी ती ओळख पुसून टाकण्याचे काम या उपक्रमातुन करणार आहे. झाडे तोडण्‍यापेक्षा प्रत्‍यारोपण करण्‍यावर भर दिला जात असल्याचे ते बोलताना म्हणालेत. द्वारका एक्‍स्‍प्रेस हायवेवर 12 हजार झाडांचे प्रत्‍यारोपण करण्‍यात आले आहे. वन व पर्यावरण मंत्रालयासमोर प्रत्‍येक संस्‍थेला ट्री बँक स्‍थापन करण्‍याची मान्‍यता देण्‍यासंदर्भातील प्रस्‍ताव देण्‍यात आला असून झाडांची संपूर्ण माहिती त्‍यामाध्‍यमातून ठेवली जाईल. एका झाडाचे प्रत्‍यारोपण करायचे असल्‍यास पाच नवी झाडे लावावी लागतील व एक झाड तोडायचे असल्‍यास दहा झाडे लावावी लागतील. वृक्षारोपण करताना कार्बन डॉय ऑक्‍साईड शोषून घेणारी व अधिक ऑक्सिजन उत्‍सर्जिंत करणारी झाडे लावली जाणार असेही गडकरी म्हणालेत. 


महामार्गावर आतापर्यंत महामार्ग प्राधिकरणाने 2 कोटी 75 लाख झाडे लावली असून यावर्षी 75 लाख झाडे लावण्‍याचा मानस असल्याचे राष्‍ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सल्‍लागार अशोक कुमार जैन यावेळी म्हणालेत.