Maharashtra Political Crisis : राज्यातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) सकाळपासून सुप्रीम कोर्टात सुरु आहे. शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांनी राज्यपालांचे अधिकार, अपात्रतेचा मुद्दावर आजही जोरदार युक्तिवाद केला. त्यानंतर शिंदे गटाचे दुसरे वकील नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद सुरु केला. अंतर्गत मतभेद हा लोकशाहीचा भाग आहे. मतभेद व्यक्त केले म्हणजे पक्षाविरोधात बंड केलं असं होत नाही असं कौल म्हणाले. गटनेता आणि प्रतोद याबाबतही कौल यांनी आपली बाजू मांडली. प्रतोद बदलल्याचं गटनेतेच अध्यक्षांना कळवतात, याआधीही सेनेने जेव्हा प्रतोद बदलला तेव्हा गटनेत्यानेच कळवलं होतं, असा युक्तिवादही कौल यांनी सुप्रीम कोर्टात केला. 


शिंदे गटाचे वकील नीरज किशन कौल म्हणाले की, "आमचा मुद्दा एवढाच आहे की वेगळा झालेला गट हाच खरा पक्ष आहे आणि त्याला निवडणूक आयोगानेही मान्यता दिली आहे. एका बैठकीला हजर राहिले नाहीत म्हणून आमदारांना नोटीस पाठवली गेली आणि त्यावर उपाध्यक्षांनीही केवळ दोन दिवस अवधी दिला. जे नियमांच्या विरोधात आहे. पक्षांतर्गत नाराजी हा लोकशाही प्रक्रियेचा भाग आहे. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. पक्षांतर्गत नाराजीनंतर जे प्रस्ताव तयार झाला तो राज्यपालांकडे पाठवण्यात आला होता. 


विधीमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष हे एकमेकांशी जोडलेले : कौल 


दोन्ही गटांकडून व्हिप जारी करण्यात आले होते. पण मुळात विरोधी गटाकडून राजकीय पक्ष आणि विधीमंडळ पक्षात फरक केला गेला. पण विधीमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष हे एकमेकांशी जोडलेले आहेत, त्यांचा वेगवेगळा विचार केला जाऊ शकत नाही. शेवटी राजकीय पक्षाचं अस्तित्वच त्या पक्षाच्या विधीमंडळ पक्षावर अवलंबून असते. तुम्ही केवळ विधीमंडळ पक्षाचे सदस्य होते आणि राजकीय पक्षाचे नाही हे म्हणणंच नियमाचा भंग करण्यासारखं आहे. शेवटी विधानसभा अध्यक्ष निर्णय कसा घेणार? विधीमंडळ पक्षाचा नेताच अध्यक्षांना माहिती देत असतात. शिवसेना पक्षातही कायम विधीमंडळ पक्ष नेत्यानेच प्रतोदांबद्दल किंवा बदलाबदलींची माहिती अध्यक्षांना पुरवली आहे, असेही कौल म्हणाले. 


दोन्ही गटांचा एकत्र येण्याचा मार्ग पूर्णपणे बंद, जेठमलानींचा युक्तिवाद


शिवसेनेच्या आमदारांमध्ये नाराजी अचानक निर्माण झाली नव्हती तर महाविकास आघाडी तयार झाल्यापासूनच नाराजी होती. मात्र 21 जूनला वाद वाढला. एकनाथ शिंदेंना विधीमंडळ पक्षनेते पदावरुन हटवल्यानंतर दोन्ही गटांचा एकत्र येण्याचा मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. एकत्र येणं अशक्य झाल्याने पक्षाच्या व्यासपीठावर एकत्र चर्चेचा प्रश्नच उरला नाही, असा युक्तिवाद जेठमलानी यांनी केला.