Maharashtra Political Crisis Shivsena : शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीला शिवसेना भवनात सुरुवात झाली असून या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. शिवसेनेत अभूतपूर्व झालेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे. या  बैठकीत शिवसेना नेते पदावरून एकनाथ शिंदे आणि रामदास कदम यांचीही हकालपट्टी होणार असल्याची शक्यता आहे. शिवसेना फुटीरतावाद्यांवर कारवाई करण्याच्या दृष्टीने आता शिवसेनेकडून पावले उचलली जात आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडखोर गटाने 'शिवसेना- बाळासाहेब ठाकरे' असे नाव आपल्या गटाला दिले असल्याचे वृत्त आहे. 


मागील पाच दिवस राज्याचे राजकारण शिवसेनेच्या बंडखोरीने ढवळून निघाले आहे. शिवसेना पक्षात आता उभी फूट पडली असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे सध्या शिवसेनेचे 38 आमदार असून अपक्षांसह 46 आमदार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. 


या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक होणार आहे. शिवसेनेच्या घटनेनुसार आता एकनाथ शिंदे आणि रामदास कदम यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. एकनाथ शिंदे आणि रामदास कदम हे शिवसेना नेते पदावर आहेत. आता, त्यांची या पदावरून हकालपट्टी करण्यात येण्याची शक्यता आहे. या कारवाईने त्यांच्यावरील दबाव वाढवण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून सुरू आहे. 


रामदास कदम यांचा मुलगा आमदार योगेश कदम हे देखील एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. रामदास कदमदेखील शिवसेना नेतृत्वावर नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांनीदेखील पक्षविरोधी कारवाई केल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे रामदास कदम यांच्यावरही कारवाई होणार असल्याची चर्चा आहे. 


शिवसेनेच्या या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत मुख्यमंत्री आणि पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे अनेक ज्येष्ठ नेते सहभागी झाले आहेत. या बैठकीत शिवसेनेकडून काही ठराव मांडण्यात येणार आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या :