Maharashtra Political Crisis : कोणत्याही बंडखोर आमदार आणि मंत्र्यांची सुरक्षा काढण्यात आलेली नाही. एकनाथ शिंदें यांच्याकडून जाणीवपूर्वक चुकीचे माहिती पसरवली जात आहे, असा दावा गृहखात्याने केला आहे. राजकीय आकसाने मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी बंडखोर आमदारांची सुरक्षा काढली असा आरोप एकनाथ शिंदे यांनी ट्वीटद्वारे केला होता. परंतु गृहखात्याने एकनाथ शिंदे यांचे आरोप फेटाळले आहेत. 


गृह विभागाने याबाबत ट्वीट करुन माहिती दिली. "राज्यातील कोणत्याही आमदाराचे संरक्षण काढण्याचे आदेश मुख्यमंत्री वा गृहविभागाने दिलेले नाहीत. या संदर्भात ट्विटरद्वारे केले जाणारे आरोप पूर्णपणे चुकीचे व दिशाभूल करणारे आहेत, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले," असं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.


 






 


बंडखोर आमदारांच्या कुटुंबियांना संरक्षण देण्याचे पोलिसांना आदेश : गृहमंत्री
राज्यातील शिवसैनिकांची वाढती नाराजी आणि त्यांच्या कार्यालयाची होणारी तोडफोड पाहता कुटुंबांला संरक्षण देण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. बंडखोर आमदारांच्या कुटुंबियांना संरक्षण देण्याचे आदेश गृह विभागाने पोलिसांना दिले आहेत. "विधानसभा सदस्य किंवा खासदार यांना सुरक्षा स्थानिक पातळीवर असते. ती सुरक्षा जिल्हा किंवा राज्यापुरती असते. त्यामुळे कोणाची सुरक्षा काढली नाही उलट त्यांच्या कुटुंबाला आम्ही सुरक्षा दिली आहे. पोलीस दल अलर्ट आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखावी याबाबात मी आदेश दिले आहेत," असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.


शिवसेनेत बंड करुन एकनाथ शिंदे सध्या बंडखोर आमदारांसह गुवाहाटीमध्ये आहेत. इथल्या रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये सगळ्या आमदारांचा मुक्काम आहे. 


एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवर आरोप


राजकीय आकसाने  मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी आमदारांचे संरक्षण काढून घेतले असल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला होता. एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करुन हा आरोप केला. मागील अडीच वर्षात महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून अशाच प्रकारे खच्चीकरण करण्यात आल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला आहे. 






एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात झालेल्या बंडात शिवसेनेचे जवळपास 38 आमदार सामील झाले आहेत. सध्या हे आमदार सुरतमार्गे आसाममधील गुवाहाटीत दाखल झाले आहेत. या आमदारांचे वास्तव्य असलेल्या हॉटेलबाहेर आसाम पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. शिवसेनेचे हे बंडखोर आमदार महाराष्ट्रातून बाहेर पडल्यानंतर त्यांची पोलीस सुरक्षा काढून घेतली असल्याचा आरोप केला जात आहे. 





राजकीय आकासापोटी ही सुरक्षा काढण्यात आली असल्याचा आरोप शिंदे यांनी केला. या आमदारांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी राज्य सरकारची असल्याचेही त्यांनी सांगितलं. या आमदारांच्या कुटुंबीयांना धमकावण्याचा प्रयत्न होत आहे. या आमदारांच्या कुटुंबीयांना काही झाल्यास त्याची जबाबदारी ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत जबाबदार असतील असेही शिंदे यांनी म्हटले. आमदारांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेबाबत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांच्यासह राज्यातील पोलीस आयुक्तांना हे पत्र लिहिलं होतं.