Maharashtra Crisis Aaditya Thackeray : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर पक्ष वाचवण्यासाठी शिवसेनेकडून वेगाने पावले उचलली जात आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी शिवसेना नगरसेवक आणि जिल्हा प्रमुख, पदाधिकाऱ्यांना संबोधित केल्यानंतर आज पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे आज मुंबईत शिवसैनिकांच्या मेळाव्याला संबोधित करणार आहेत. पक्षावरील संघटनात्मक पकड आणखी मजबूत  करण्यासाठी शिवसेना नेत्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. 


एकनाथ शिंदे यांच्या बंडात सामिल झालेल्या आमदारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे आता शिवसेना नेत्यांनी संघटनात्मक पकड  मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी ठिकठिकाणी गटप्रमुख, शिवसैनिकांच्या बैठका सुरू करण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मेळावा घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. 


आज , शनिवारी 25 जून रोजी सायंकाळी पाच वाजता लाला लजपतराय महाविद्यालयात शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या शिवसैनिकांच्या मेळाव्यात वरळी, महालक्ष्मी, करी रोड भागातील शिवसैनिक, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या भागावर शिवसेनेचे वर्चस्व आहे. 


त्याशिवाय, आदित्य ठाकरे हे  रविवारी सकाळी 11 वाजता सांताक्रूझ पूर्व येथील पाटक टेक्निकल हायस्कूलमधील शिवसैनिकांच्या मेळाव्याला संबोधित करणार आहेत. या मेळाव्यासाठी कलिना आणि कुर्ला विधानसभेतील शिवसैनिकांना उपस्थित राहणार आहेत. आमदार संजय पोतनीस यांनी या मेळाव्याचे आयोजन केले आहे.


दरम्यान, शुक्रवारी मुख्यमंत्री आणि पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना पक्ष पुन्हा नव्याने उभारण्याचे आवाहन केले. आमदारांना फोडले पण त्यांना निवडून देणाऱ्या शिवसैनिकांना फोडणार का असा सवाल विरोधकांना, बंडखोरांना केला. भाजपला शिवसेना संपवायची असून त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असल्याचे उद्धव यांनी म्हटले. जो शिवसैनिक माझ्यासोबत राहिल त्याच्या सोबतीने मी पुन्हा शिवसेना उभी करेन असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.