मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संबोधनानंतर आता शिवसेनेची अधिकृत भूमिका स्पष्ट झाली आहे. शिवसेना आता लढाईच्या तयारीत असून संजय राऊत यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. होय, संघर्ष करणार असं संजय राऊत यांनी ट्वीट केलं आहे.
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने होत असल्याचं ट्वीट अवघ्या सहा तासांपूर्वी संजय राऊत यांनी केलं होतं. आता मुख्यमंत्र्यांच्या संबोधनानंतर शिवसेनेची अधिकृत भूमिका स्पष्ट झाल्याचं चित्र आहे. त्यानंतर आता संघर्ष करणार असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री?
उद्धव ठाकरे म्हणाले की, "मला आज दु:ख झालं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले म्हणाले असते की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नको, तर समजून घेतलं असतं. हा त्यांचा प्रश्न आहे. पण माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको असेल तर काय बोलावं....सुरतला जाऊन बोलण्यापेक्षा समोर येऊन सांगावं.... तुम्ही नालायक आहात, तुम्ही आम्हाला मुख्यमंत्री नको असं तोंडावर सांगावं. मी आजच मुख्यमंत्रीपद सोडतो. आज राजीनाम्याचं पत्र तयार करुन ठेवतो... जे आमदार गायब आहेत त्यांनी यावं आणि ते पत्र घेऊन जावं. ही लाचारी नाही, मजबुरी नाही. जोपर्यंत माझ्यासोबत शिवसैनिक आहेत... तोपर्यंत मी कोणतेही आव्हान स्वीकारेन."
पक्षप्रमुख म्हणून मी राजीनामा द्यायला तयार
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, "ज्या शिवसैनिकांना वाटतंय की मी पक्षप्रमुख म्हणून नालायक आहे... त्यानी मला थेट सांगावं. हेही पद सोडेन. मी मुख्यमंत्रीपदी असल्याने जर कुणाला अडचण असेल तर मी मुख्यमंत्रीपद सोडणार.... माझ्यानंतर जर कुणी शिवसैनिक मुख्यमंत्री होणार असेल तर मला आनंद आहे."
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संबोधनानंतर आता एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती आहे. या दरम्यान ते काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.