Uddhav Thackeray Cabinet Decision : महाराष्ट्रातील राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने मोठे निर्णय घेतले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र सरकारने कर्जाचे पैसे नियमित भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, राजकीय आंदोलनात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात येणार आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर, काँग्रेस नेते आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, कोविडची स्थिती आणि नियमित विषयांवर चर्चा झाली. 


तत्पूर्वी, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना विधानसभा बरखास्त करण्याची शिफारस करू शकतात असे संकेत दिले आहेत. कारण महाविकास आघाडी (MVA) सरकारवरील संकट अधिक गडद झाले आहे.


सरकार अडचणीत


शिवसेनेच्या आमदारांनी पक्षाविरोधात बंड पुकारले असून, त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. तत्पूर्वी, शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी बुधवारी सांगितले की, महाराष्ट्रातील 40 आमदार आसाममधील गुवाहाटी येथे आपल्यासोबत आले आहेत, आणि ते सर्व पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या 'हिंदुत्व' विचारसरणीला बांधील आहेत.


शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रातील बंडखोर आमदारांचा एक गट बुधवारी सकाळी आसाममधील गुवाहाटी येथे दाखल झाला असून, त्यांना कडक सुरक्षा व्यवस्थेत शहराच्या बाहेरील आलिशान रॅडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये नेण्यात आले आहे. विशेष म्हणजे 288 सदस्यांच्या महाराष्ट्र विधानसभेत शिवसेनेचे 55, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष 53 आणि कॉंग्रेस 44 आहेत. सरकार स्थापनेसाठी 144 आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या