Maharashtra Political Crisis : नगर विकास मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाळीने शिवसेनेमध्ये उभी फूट पडली आहे. गेल्या चार दिवसांपासून अनेक आमदार शिंदे गटाच्या गळाला लागल्याने शिवसेनेमध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळे शिवसेनेकडूनही आता बंडखोरांवर कारवाई करण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. आतापर्यंत 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेकडून विधानसभा उपाध्यक्षांकडे करण्यात आली आहे. 


शिवसेनेने काल 12 आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, असे पत्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना पाठवले होते. आज या यादीमध्ये 4 आमदारांच्या नावाचा समावेश झाला आहे. यामध्ये आमदार, सदा सरवणकर, प्रकाश आबिटकर, संजय रायमूलकर आणि रमेश बोरनारे यांच्या विरोधात देखील शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. 


सदा सरवणकर हे मुंबईच्या माहिम मतदारसंघातून विधानसभा आमदार आहेत. ते दोन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात बोलताना दिसले होते. नंतर ते शिंदे गटाला जाऊन मिळाले. तर प्रकाश आबिटकर हे कोल्हापूरच्या राधानगरी मतदारसंघातून आमदार आहेत. संजय रायमूलकर हे बुलढाण्यातील मेहकर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून निवडून गेले आहेत तर रमेश बोरनारे औरंगाबादच्या वैजापूर मतदारसंघाचे आमदार आहेत. 


एकनाथ शिंदे यांनी 40 पेक्षा जास्त आमदारांना सोबत घेत बंड पुकारलं आहे. बंडखोर आमदारांवरील कारवाईसंदर्भात शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी माहिती दिली आहे. पहिल्या टप्प्यात 12 नावं दिली, उर्वरितांवरही कारवाईची मागणी करु, असेही त्यांनी म्हटले आहे.


सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करण्यात आलेले आमदार 


1 ) एकनाथ शिंदे
2) अब्दुल सत्तार 
3) संदीपान भुमरे 
4) प्रकाश सुर्वे 
5) तानाजी सावंत 
6) महेश शिंदे 
7) अनिल बाबर 
8) यामिनी जाधव 
9) संजय शिरसाट 
10) भरत गोगावले 
11) बालाजी किणीकर 
12) लता सोनावणे
13) सदा सरवणकर
14) प्रकाश आबिटकर
15) संजय रायमूलकर
16) रमेश बोरनारे


इतर महत्त्वाच्या बातम्या