Maharashtra Political Crisis : शिवसेनेतील दोन तृतियांश आमदार फुटल्यावनं एकनाथ शिंदेंसोबत (Eknath Shinde) आलो, अशी प्रतिक्रिया एबीपी माझाशी बोलताना शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी दिली. तसेच, स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या हालचाली सुरु झाल्याचंही बच्चू कडू यांनी सांगितलं. तसेच, सध्या गुवाहाटीमधील हॉटेलमध्ये शिवसेनेचे 33 आमदार एकनाथ शिंदेंसोबत असल्याची माहितीही बच्चू कडू यांनी दिली आहे.
शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू एबीपी माझाशी बोलताना म्हणाले की, "सध्या मी गुवाहाटीला आहे. आज सर्व आमदारांची बैठक होणार आहे. त्यानंतर आज रात्रीपर्यंत चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर पुढची रणनिती स्पष्ट होईल. सध्या शिवसेना आणि अपक्ष मिळून 36 आमदार गुवाहाटीत आहेत. आज आणखी 3 ते 4 आमदार येणार आहेत. फक्त शिवसेना आमदारांचा आकडा 38 ते 39 पर्यंत जाईल. तर अपक्ष मिळून हा आकडा 50 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. पुढच्या दोन ते तीन दिवसांत चित्र स्पष्ट होईल."
आमदार काही पत्रांवर सह्या करतानाचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या हालचाली सुरु झाल्यात का? या प्रश्नावर बोलताना, स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या हालचाली सुरु झाल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं. तसेच, सूरत आणि आसाममधील स्थानिक भाजप नेते यांच्यासोबतच महाराष्ट्रातीलही भाजपचे नेते संपर्कात असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं. तसेच, महाराष्ट्रातून भाजप नेते संजय कुटेही एकनाथ शिंदे आणि सेना आमदारांसोबत गुवाहाटीमध्ये आहेत, असं बच्चू कडू म्हणाले.
"आम्ही शिवसेनेतील घटक पक्ष होतो. प्रहास संघटनेच्या माध्यमातून आम्ही दोन आमदारांनी शिवसेनेच्या माध्यमातून महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता. शिवसेनेचे जवळपास 75 टक्के आमदार एकनाथ शिंदेंसोबत आले आहेत. अशी काही नाराजी नाही, पण निधी वाटप, निधी वाटपातील विषमता यांमुळे काहीशी नाराजी आहे. हे सगळं चर्चा करुन झालं असतं. पण पक्षश्रेष्ठींकडून शिवसेनेच्या आमदारांकडे जे लक्ष द्यायला हवं होतं, ते झालं नाही. त्यामुळे प्रचंड नाराजी होती.", असं बच्चू कडू म्हणाले. तसेच, मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी फोन करुन संवाद साधला होता. आम्ही राज्यसभा, विधान परिषदेला शिवसेनेला मतदान केलं, यावर चर्चा झाली होती. पण यासर्व प्रकाराबाबत काहीच माहीत नव्हतं.
बच्चू कडू म्हणाले की, "मागे प्रतिक्रिया देताना मी पुढच्या पाच वर्षांबाबत बोललो होतो. पण मला माहीत नव्हतं ते सगळं आताच होईल. इथे कोणावरच अत्याचार, अन्याय होत नसून सगळे खूश आहेत. एकादिलानं इथे आहोत, असंही बच्चू कडू यांनी सांगितलं आहे. एकनाथ शिंदेंसोबत येणाऱ्या आमदारांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. हा आकडा 50 पर्यंत पोहोचू शकतो. अनेक आमदार स्वतःहून फोन करुन आम्ही येतोय असं सांगत आहेत." तसेच, 36 आमदार गुवाहाटीमध्ये आहेत. आणखी 3 ते 4 येणार आहेत. 36 पैकी शिवसेनेचे 33 आमदार आहेत, तर उरलेले अपक्ष असल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली. एकूण संख्याबळ 50 पर्यंत जाईल, असंही बच्चू कडू म्हणाले.