Maharashtra Political Crisis : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थोड्याच वेळात जनतेशी संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी काय भूमिका स्पष्ट करणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर बंडखोर एकनाथ शिंदेही सायंकाळी पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांसोबत बैठक झाल्यानंतर एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्यानंतर एकनाथ शिंदे काय बोलणार याकडेही सर्वांचे लक्ष लागलेय.
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्यासोबत 40 आमदार असल्याचं जाहीर केलं. त्यावर शिवसेनेकडून आमदारांच्या बैठकीसंबधी एक पत्र जाहीर करण्यात आलं होतं. पण ते अवैध असल्याचं सांगत एकनाथ शिंदेनी आमदार भरत गोगावले हे पक्ष प्रतोद असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे बंडखोर एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये आता उभी फूट पडल्याचं दिसून येतंय. दोघांच्याही भूमिकेकडे आता महाराष्ट्रासह भारताचं लक्ष लागलेय.
दरम्यान, सध्या महाराष्ट्रात राजकीय पेच निर्माण झाला आहे. अशातच शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह बंड पुकारला आणि शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. राज्यात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. राज्यातील राजकारणावर या बंडाचा थेट परिणाम होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळपास 40 आमदार असल्याचं म्हटलं जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील ठाकरे सरकार पणाला लागलं. एकनाथ शिंदे समर्थक आमदारांसह स्वतंत्र गट बनवणार असल्याचं समजतं. यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्यासह समर्थक आमदारांचा मुक्काम सध्या आसामच्या गुवाहाटीमधील हॉटेल रॅडिसनमध्ये आहे.
एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान
शिवसेना पक्ष प्रतोदपदी आता आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात असल्याची माहिती बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी यासंबंधी एक ट्वीट केलं आहे. शिवसेनेचे पक्षप्रतोद सुनिल प्रभू यांनी एक आदेश काढला होता. तो आदेश अवैध असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. बंडखोर आमदारांविरोधात शिवसेनेकडून (Shivsena) कारवाई सुरू करण्यात आली असून बैठकीला हजर राहा अन्यथा अपात्र ठरवू, असं पत्र बंडखोर आमदारांना पक्षाकडून पाठवण्यात आलं आहे. शिवसेनेचे पाटणचे आमदार शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांना पत्र पाठवलं आहे. हे पत्र एबीपी माझाच्या हाती लागलं आहे. या पत्रातून बैठकीला उपस्थित राहिला नाहीत, तर थेट कारवाई करणार असल्याचं आमदारांना ठणकावून सांगितलं आहे.