मुंबई: शिवसेना पक्ष प्रतोदपदी आता आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात असल्याची माहिती बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी यासंबंधी एक ट्वीट केलं आहे. शिवसेनेचे पक्षप्रतोद सुनिल प्रभू यांनी एक आदेश काढला होता. तो आदेश अवैध असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. 







बंडखोर आमदारांविरोधात शिवसेनेकडून (Shivsena) कारवाई सुरू करण्यात आली असून बैठकीला हजर राहा अन्यथा अपात्र ठरवू, असं पत्र बंडखोर आमदारांना पक्षाकडून पाठवण्यात आलं आहे. शिवसेनेचे पाटणचे आमदार शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांना पत्र पाठवलं आहे. हे पत्र एबीपी माझाच्या हाती लागलं आहे. या पत्रातून बैठकीला उपस्थित राहिला नाहीत, तर थेट कारवाई करणार असल्याचं आमदारांना ठणकावून सांगितलं आहे. 


शिवसेनेच्या वतीने पक्षप्रतोद सुनिल प्रभू यांनी हे पत्र काढलं आहे. आता हा आदेश अवैध असून विधिमंडळाच्या मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. त्यामुळे सुनिल प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश हे कायदेशीरदृष्ट्या अवैध असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.