Maharashtra Political Crisis : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी करत आमदारांसह आधी सूरत आणि नंतर गुवाहाटी गाठलं. आता शिंदे गटाकडून त्यांच्याकडे 48 आमदार असल्याचा दावा केला जात आहे. अशात शिवसेनेने शिंदे गटाचे 12 आमदार निलंबित करण्याचं पत्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना दिलं आहे. जे आमदार आपल्याकडे परत येणार नाहीत अशी ठाम खात्री आहे, अशा 12 आमदारांची नावं या यादीत दिल्याची माहिती आहे. जर हे 12 आमदार निलंबित झाले तर फ्लोअर टेस्टच्या वेळी गणित काय असेल याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. 


असं होऊ शकतं गणित...
महाराष्ट्र विधानसभेत सदस्यसंख्या 288 आहे. यातील एक शिवसेना आमदार रमेश लटके यांचं निधन झालं आहे तर राष्ट्रवादीचे दोन आमदार नवाब मलिक आणि अनिल देशमुख हे तुरुंगात आहेत. त्यामुळं उरले 285 आमदार. जर यातून शिंदे गटाचे 12 आमदार निलंबित झाले तर आकडा उरतो 273. यामुळं 137 हा बहुमताचा आकडा राहू शकतो. त्यानंतर राष्ट्रवादीचे 51, काँग्रेसकडे 44 आणि शिवसेनेचे 12 वजा करुन 43 आमदार राहतील. हे तीन पक्ष मिळून 138 हा आकडा महाविकास आघाडी सहज गाठू शकते. शिवाय यात काही अपक्ष देखील जोडले जाऊ शकतात.  


शिंदे गटाकडून 48 आमदार असल्याचा दावा केला जातोय. त्यात शिवसेनेचे 37 आमदार असल्याचं बोललं जात आहे. अपक्ष मिळून 48 च्या वर आकडा असल्याचं शिंदे गटाकडून बोललं जात आहे. यातील 12 आमदार जरी निलंबित झाले तरी 50 च्या आकड्यामधून 38 आमदार राहतील. त्यानंतर दोन तृतीअंशचा कोटा देखील कमी होणार आहे. मात्र 12 आमदारांचं निलंबन झाल्यानंतर प्रत्यक्ष फ्लोअर टेस्टवेळी किती सदस्य राहतात यावरुन भाजपसोबत सत्ता स्थापण्याबाबतचा निर्णय होऊ शकेल. भाजपचे 106  आणि त्यांच्यासोबत दहापेक्षा अधिक अपक्ष असल्याचा दावा केला जात आहे.  
 
कोण आहेत ही 12 आमदार ज्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आलीय?  
1 ) एकनाथ शिंदे
2) अब्दुल सत्तार 
3) संदीपान भुमरे 
4) प्रकाश सुर्वे 
5) तानाजी सावंत 
6) महेश शिंदे 
7) अनिल बाबर 
8) यामिनी जाधव 
9) संजय शिरसाट 
10) भरत गोगावले 
11) बालाजी किणीकर 
12) लता सोनावणे