मुंबई: आपण ज्यांना मोठं केलं त्यांची स्वप्नं मोठी झाली, आता ती आपण पुरी करु शकत नाही असं मुख्यंमत्री उद्धव ठाकरे म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्या मुलाला खासदार केलं, मग माझ्या मुलाने काहीच करु नये का असा सवालही त्यांनी केला. या सर्वाचा आता वीट आला असून तीच वीट आपण यांच्या डोक्यात हाणणार असं सांगत उद्धव ठाकरे यांनी आता एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांना थेट आव्हान दिलं आहे. शिवसेनेच्या वतीने आज राज्यातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीसाठी राज्यातले जवळपास 250 अधिक पदाधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.


राक्षसी महत्त्वाकांक्षा नसावी
मुख्यमंत्र्यांनी आज शिवसेना पदाधिकांऱ्यांशी चर्चा केली. त्यावेळी ते म्हणाले की, आपण यांना सर्व काही दिलं. मुख्यमंत्र्यांकडे नगरविकास खातं असतं, पण पैशाचा विषय नको म्हणून ते खातं एकनाथ शिंदे यांना दिलं. पण आपण ज्यांना मोठं केलं त्यांची स्वप्न आता मोठी होत आहेत. ती आपण पुरी करु शकत नाही. महत्त्वाकांक्षा असावी, पण ज्यानं दिलं त्यालाच खावं अशी राक्षसी महत्त्वाकांक्षा नसावी.


आपल्यासोबत कोणी नाही असं समजून नवी शिवसेना उभी करा
आधी यांच्यासाठी बाळासाहेब विठ्ठल होते, आणि आम्ही बडवे होतो. आता मी विठ्ठल आहे आणि आदित्य बडवा आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. ते म्हणाले की, या सर्वामागे भाजपचा हात आहे. आतापर्यंत जे लोक भाजपसोबत गेले, ते सर्वजण संपले आहेत. मातोश्रीवर घाणेरडे आरोप केल्यानंतर मी शांत बसणार नाही. आपल्यासोबत कोणी नाही असं समजून नवी शिवसेना उभी करा. 


भाजपसोबत गेलेत ते संपलेत
कितीही आमदार घेऊन जा, शिवसेनेला काहीही होणार नाही असं सांगत उद्धव ठाकरे म्हणाले की, काही आमदार म्हणाले होते की तिकीट कापलं तरी आम्ही शिवसेना सोडून जाणार नाही. बंड झाल्यानंतरही शिवसेना दोन वेळा सत्तेत आली.