Maharashtra Police :  अनेक वर्ष सेवा केल्यानंतर नियमांप्रमाणे मिळणाऱ्या बढतीसाठी राज्यातील पोलिसांना (Maharashtra Police) बढतीसाठी (Police Promotion) प्रतिक्षा करावी लागत आहे. काहींना तर निवृत्तीच्या दिवशीच प्रमोशन मिळाले. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर 2022 मध्ये जवळपास 175 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची बढती करण्यात आली. त्यानुसार त्यांना सहायक पोलिस आयुक्त पदी (Assistant Commissioner of Police) बढती मिळणे अपेक्षित होते. मात्र, या बढतीच्या आदेशावर चार महिन्यानंतरही कोणतीही कार्यवाही झाली नाही. 


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दरम्यानच्या कालावधीत 1991-92 बॅचचे अधिकारी असलेल्या 5 ते 7 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना एसीपी म्हणून बढती देण्यात आली. मात्र, हे अधिकारी त्याच दिवशी निवृत्त झाले. एबीपी न्यूजशी बोलताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, सेवानिवृत्तीच्या दिवशी पदोन्नती मिळणे खूप विचित्र वाटते. पोलिसांच्या विभागीय पदोन्नती समितीनेत्यांच्या पदोन्नतीला अनेक महिन्यांपूर्वी मान्यता दिली आहे. मात्र, त्यानंतरही त्यांना निवृत्तीपर्यंतची प्रतिक्षा करावी लागते, हे विचित्र आहे. 


महाराष्ट्र पोलीस महासंचालकांच्या कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, महाराष्ट्रात एकूण 754 एसीपी पदे आहेत, त्यापैकी 279 पदे रिक्त आहेत. गेल्या वर्षी 175 जणांना बढती देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यापैकी काही लोकांनी प्रमोशनसाठी आपली संमती दर्शवली नाही. त्यानंतर हा आकडा 163 झाला आणि काही लोकांनी प्रमोशन करण्यास नकार दिला, त्यामुळे आता हा आकडा 152 च्या आसपास आहे. 


अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या बढतीबाबतच्या समितीच्या संबंधितांना बढती देण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांना महसूली विभागाप्रमाणे जबाबदारी दिली जाते. महाराष्ट्र पोलीस महासंचालकांच्या पातळीवर बढती संबंधीची सगळी प्रक्रिया पूर्ण झाली असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. आता पोलीस अधिकाऱ्यांच्या बढतीबाबतची प्रक्रिया आता मंत्रालयात अडकली आहे. मंत्रालयातील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना पोस्टिंग दिल्या जातील. मात्र, मंत्रालयातून प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 


पदोन्नतीच्या प्रतिक्षेत असलेल्या एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने सांगितले की, आम्ही मागील काही दिवसांपासून प्रतिक्षा करत आहोत. मात्र, सरकारकडून कोणताही आदेश आला नाही. अखेर हक्काच्या बढतीसाठी किती काळ प्रतिक्षा करावी लागेल, हे माहित नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. आम्ही 1991-92, 1992-93 बॅचचे अधिकारी आहोत आणि दर महिन्याला अनेक लोक सेवानिवृत्त होत आहेत. पाच ते सहा जण मार्च महिन्यात, आठ जण  एप्रिल महिन्यात आणि 10 जण मे महिन्यात सेवानिवृत्त होत आहेत. मात्र, अद्यापही बढतीचे आदेश आले नाहीत. 


महसूली विभागाप्रमाणे पोस्टिंग


महाराष्ट्रात नागपूर विभाग, अमरावती विभाग, पुणे विभाग, औरंगाबाद विभाग, नाशिक विभाग, कोकण-1 विभाग आणि कोकण-2 विभाग असे महसूली विभाग आहेत. ज्या अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळते. त्यांना कोणत्या महसूली विभागात पदोन्नती हवी, याबाबत विचारणा केली जाते. त्या अधिकाऱ्याच्या मंजूरीनंतर त्या महसूली विभागात किती रिक्त जागा आहेत. त्यानुसार, त्यांची नियुक्ती त्या महसूली विभागातील जिल्ह्यात पदोन्नतीसह केली जाते.