पिंपरी चिंचवड : गृहविभागाने आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या अन् त्यानंतर अवघ्या काही तासांत स्थगितीची बातमी येऊन धडकली. यावरून रणकंदन सुरू असतानाच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त पदाची सूत्र अंकुश शिंदेंनी हाती घेतली. आयर्नमॅन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश सुट्टीवरून येण्यापूर्वीच अंकुश शिंदेंनी हा पदभार स्वीकारला. या आदेशाला ही स्थगिती येईल अथवा कृष्ण प्रकाश न्यायालयात दाद मागतील आणि पदभार स्वीकारण्यात ख्वाडा येईल. म्हणूनच अंकुश शिंदेंनी कृष्ण प्रकाशांच्या अनुपस्थितीत इतक्या तातडीनं पदभार स्वीकारला. अशी चर्चा पिंपरी चिंचवड आयुक्तालयात रंगली होती. 


आयर्नमॅन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश आठवडाभरापासून सुट्टीवर आहेत. आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ते बोस्टनला गेलेत. आपली बदली होईल अशी कृष्ण प्रकाशांना पुसटशी कल्पना ही नव्हती मात्र जे घडायचं ते घडलं. अन् त्यांची तडकाफडकी बदली झाली. त्यांच्याजागी राज्य सुधारसेवा विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक अंकुश शिंदेंची वर्णी लागली. सुट्टीवर असतानाच आयर्नमॅन कृष्ण प्रकाशांना हा धक्का बसला. हे कमी होतं की काय ते सुट्टीवरून येण्यापूर्वीच अंकुश शिंदेंनी आयुक्त पदाचा पदभार हाती घेतला. 21 एप्रिल म्हणजे गुरुवारी कृष्ण प्रकाशांची सुट्टी संपणार होती अन 22 एप्रिलला ते रुजू होणार होते. त्यामुळे नवनियुक्त पोलीस आयुक्त अंकुश शिंदे 22 एप्रिलला कृष्ण प्रकाशांकडून पदभार स्वीकारतील अशी अपेक्षा होती. मात्र शिंदेंनी प्रकाशांची वाट न पाहताच आयुक्तांच्या खुर्ची बसणं पसंत केलं. यानिमित्ताने आयुक्तालयात नव्या चर्चांना उधाण आलं.


गृहविभागाने आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यानंतर बारा तासातच स्थगितीची बातमी येऊन धडकली. त्यात अंकुश शिंदे आणि कृष्ण प्रकाशांचे ही नाव नव्हते. पण स्थगितीचा आणखी एक असाच सुधारित आदेश आला तर? अथवा आयर्नमॅन कृष्ण प्रकाशांनी न्यायालयात दाद मागितली तर? पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारण्यात ख्वाडा येऊ शकतो. म्हणूनच बदलीच्या आदेशाला चोवीस तास उलटण्यापूर्वीच अंकुश शिंदेंनी शहराची सूत्र हाती घेतली. यासाठी कृष्ण प्रकाश हे सुट्टीवरून परतण्याची त्यांनी रिस्क घेतली नाही. अशीच काहीशी चर्चा पोलीस आयुक्तालयात रंगलेली पहायला मिळाली. पहिल्याच दिवशी त्यांनी पत्रकारांशी बोलणं टाळलं. आधी शहराची अन आयुक्तालयाची माहिती घेतो मग प्रसारमाध्यमांशी मनमोकळा संवाद साधतो, अशी पहिली प्रतिक्रिया नवनियुक्त पोलीस आयुक्त अंकुश शिंदेंनी दिली.