Sanjay Raut on Phone Tapping Case : महाराष्ट्रात सरकार बनत असताना आमच्यावर पाळत ठेवण्यासाठी फोन टॅपिंग केल्याचा खळबळजनक आरोप संजय राऊतांनी केला आहे. तर रश्मी शुक्ला यांना केंद्राचं संरक्षण असल्याचा आरोपही संजय राऊतांनी केला आहे. दरम्यान, संजय राऊत (Sanjay Raut), एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे फोन 'समाजविघातक घटक' या नावाखाली टॅप होत असल्याची माहिती एबीपी माझाला सूत्रांनी दिली आहे. राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तपासात मिळालेल्या पत्रातून माहिती समोर आली आहे. यापूर्वी एकनाथ खडसेंचा फोन 67 दिवसांपर्यंत आणि संजय राऊतांचा फोन 60 दिवस टॅप झाल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. 


शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, "नाना पटोले (Nana Patole), एकनाथ खडसे, माझ्यासहित सर्वांना समाजविघातक घटक असल्याचं खोटं सांगत फोन टॅप करण्यात आले होते हे समोर आलं आहे. गृहविभागाकडून फोन टॅपिंगची परवानगी घेताना रश्मी शुक्ला यांनी ड्रग्ज तस्कर, गँगस्टर असल्याचं सांगितलं. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार तयार होत असताना आमच्यावर नजर ठेवत नव्या सरकारसंबंधी माहिती घेतली जात होती. आमच्या अभिव्यक्तीवर घाला घालण्यात आला. एक पोलीस अधिकारी ज्यांच्याकडून तुम्ही निष्पक्ष काम करण्याची अपेक्षा ठेवता त्या एका राजकीय पक्ष, नेत्यासंबंधी आपली निष्ठा सिद्ध करण्यासाठी हे सर्व करत होती. आता रश्मी शुक्ला यांना केंद्र सरकार संरक्षण देत आहे. हे दुर्भाग्यपूर्ण आहे "


संजय राऊत यांचा 60 दिवस तर एकनाथ खडसे यांचा 67 दिवस फोन टॅप : सूत्र


यापूर्वी संजय राऊत यांचा 60 दिवस तर एकनाथ खडसे यांचा 67 दिवस फोन टॅप होत असल्याचं समोर आलं होतं. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "पहिल्यांदा तातडीच्या आधारावर संजय राऊत यांचा सात दिवस फोन टॅप करण्यात आला आणि दुसऱ्यांदा एसीएस होमच्या परवानगीने 60 दिवस फोन टॅप करण्यात आला. मुंबई पोलिसांनी तत्कालीन एसीएस होम एस कुमार यांचा जबाबही नोंदवला आहे. एकनाथ खडसे आणि संजय राऊत यांचं नाव एसआयडीच्या स्वरुपात फोन टॅपिंगच्या विनंतीमध्ये असल्याचं कुमार यांनी आपल्या जबाबात सांगितलं होतं. महत्त्वाचं म्हणजे एकनाथ खडसे किंवा संजय राऊत यांचा फोन टॅप होत असल्याचं कोणालाही कळू नये म्हणून एसआयडीकडून चुकीच्या नावानं विनंती करण्यात आल्याचंही सूत्रांनी सांगितलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत दहा पेक्षा अधिक जणांचे जबाब नोंदवले आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :