Sanjay Rathod: शिंदे फडणवीस सरकार मधील आणखी एक मंत्री अडचणीत आले आहेत. अब्दुल सत्तार यांच्या पाठोपाठ आता संजय राठोड यांच्यावरही गायरान जमीन प्रकरणी आरोप झाले आहेत. त्यामुळे ऐन अधिवेशनात शिंदे सरकारची डोकेदुखी आणखी वाढली आहे. अब्दुल सत्तार यांचं प्रकरण शांत होत नाही, तोवर शिंदे फडणवीस सरकार मधील आणखी एका मंत्र्यांवर विरोधकांनी घोटाळ्याचा आरोप केला आहे. 


संजय राठोड यांच्यावर काय आरोप?


संजय राठोड महसूल राज्यमंत्री असताना त्यांनी वाशिम जिल्ह्यातील मंगळूरपीर तालुक्यातील सावरगाव येथील गायरानाची जमीन खासगी व्यक्तीला देण्याचे आदेश काढले होते. 


25 कोटी रुपयांची 10 एकर गायराण जमीन वाटप केल्याचा आरोप 


सात ऑगस्ट 2019 रोजी महसूल राज्यमंत्री संजय राठोड असताना हा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळाली आहे. 


बनावट कागदपत्रे दाखल केल्याप्रकरणी संबंधित व्यक्तींवर फौजदारी गुन्हा दाखल करुनही जमीन पुन्हा सरकारला वर्ग करावी, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते.


मात्र हे सर्व आदेश डावलून हा निर्णय घेण्यात आला


संजय राठोड यांच्यावर हे गंभीर आरोप झालेले असताना गेल्या दोन दिवसांपासून संजय राठोड मात्र विधिमंडळाकडे फिरकले नाहीत. सध्या ते नॉट रीचेबल आहेत.
तर दुसरीकडे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची पदवी बोगस असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते अभिषेक हरदास यांनी केला आहे.  उदय सामंत यांनी पुण्यातील ज्ञानेश्वर विद्यापीठातून अॅटोमोबाईल डिप्लोमा इंजिनियरिंगची पदवी घेतल्याचं त्यांनी निवडणूक आयोगाला सादर कालेल्या शपथपत्रात नमुद आहे. परंतु ज्ञानेश्वर विद्यापीठाला पदवी देण्याचा अधिकारच नाही, असा निर्णय असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज या विद्यापीठांच्या शिखर संस्थेने दिला आहे. यावरून विरोधकही आक्रमक झाले आहेत.


दुसरीकडे अब्दुल सत्तार यांच्या मुद्द्यावरूनही विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीईटी घोटाळा कसा झाला? लाखो विद्यार्थ्यांचं स्वप्न चुरडण्याचं काम कुणी केलं? अपात्र कंपन्यांना पात्र करण्याचं काम कुणी केलं? असा सवाल विचारला. नागपूर येथे हिवाळी अधिवेशन असलं तरीही राजकीय आरोप प्रत्यारोपामुळे हे अधिवेशन तापवण्याचा प्रयत्न केला जातो. या अधिवेशनात अब्दुल सत्तार, उदय सामंत, संजय राठोड, दादा भुसे, शंभूराजे देसाई या मंत्र्यांवर आरोप केले गेले परंतु अद्याप तरी विरोधकांनी एकही प्रकरण तडीस नेलं नाही. त्यामुळे बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात या म्हणीची आठवण होते.