जळगाव : जळगाव जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव वाढत असतानाच रुग्णालयात वापरण्यात येत असलेल्या मास्कचा वापर गादी बनवण्यासाठी केला जात असल्याचं निदर्शनास आलं. यानंतर पोलिसांनी कुसुंबा गावात गादी बनवणाऱ्या कारखान्यावर कारवाई करत तो नष्ट केला. कारखान्याच्या मालकावर आपत्ती व्यस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


जळगाव जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या लाखांच्या वर जाऊन पोहोचल्याने प्रशासनासमोर त्यावर नियंत्रण मिळवण्याचं मोठं आव्हान आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. त्याला जनतेची साथ आवश्यक असताना, काही नागरिक मात्र अतिशय बेजाबदारपणाच वर्तन करत असल्याचं पाहायला मिळत आहे. 


अशाच एका घटनेत कुसुंबा गावात वापरलेल्या मास्क आणि हॅण्ड ग्लोव्जपासून गादी बनवण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी कुसुंबा गावातील महाराष्ट्र गादी भांडार या कारखान्यावर छापा मारला. यावेळी त्या ठिकाणी मास्कचा वापर करत गाद्या तयार केल्या जात असल्याचं निदर्शनास आलं.


पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या गाद्या आणि शिल्लक मास्क नष्ट केले. या घटनेत गादी कारखाना मालक अमजद अहमद मनसुरी याच्याविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा अधिक सखोल तपास करत आहेत.