रत्नागिरी : गुहागर तालुक्यातील अंजनवेल-दाभोळ येथील रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्पाचा रेल्वे जवळचा वीज खरेदी करार संपुष्टात आल्याने गुरुवारी मध्यरात्री 12 वाजल्यापासून वीज निर्मिती बंद करण्यात आली आहे. शेवटचे 240 मेगावॅट पऱ्यांची वीज पुरवून आर्थिक वर्षाच्या मध्यरात्रीपासून टरबाइनची धडधड थांबली आहे. प्रकल्प सुरू ठेवण्यासाठी नवीन करारासाठी कंपनीच्या वतीने केंद्र सरकारकडे प्रयत्न सुरू आहेत. परंतु जोपर्यंत कमी दरामध्ये नॅचरल गॅस उपलब्ध होत नाही तोपर्यंत वीज निर्मिती अशक्य आहे.तर पुढील 1 महिन्यासाठी विजेची मागणी होण्यासाठी शक्यता आहे. अशी माहिती आरजीपीपी चे एचआर जॉन फिलिप्स यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.


नॅचरल गॅस कमी दरामध्ये उपलब्ध होत असल्याने सुरुवातीपासून आरजीपीपीएल कंपनीला वीज निर्मितीसाठी तारेवरील कसरत करावी लागत होती. केंद्र सरकारने गॅस वरील सबसिडी देऊन रेल्वे साठी 500 मेगावॅट वीजनिर्मितीचा करार करून आरजीपीपीएल कंपनी सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला होता. 1 एप्रिल 2017 पासून ते मार्च 2022 पर्यंत पाच वर्षा करता हा करार करण्यात आला होता. परंतु मध्यंतरीच्या काळात गॅसवरील सबसिडी बंद केल्याने तयार होणारी वीज महाग ठरली. परिणामी रेल्वे कडील विजेची मागणी कमी करण्यात आली होती. शेवटच्या स्टेजमध्ये दिवसाला 250 ते 300 मेगावॅट मागणीनुसार वीज निर्मिती केली जात होती. करार संपुष्टात येत असताना व कमी दरामध्ये वीज निर्मिती होत नसल्याने कोणताही नवीन वीज खरेदीचा करार झाला नाही. शेवटी गुरुवारी 31 मार्च रोजीच्या मध्यरात्री आरजीपीपीएल कंपनीची वीजनिर्मिती पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.


गॅस उपलब्ध झाला नाही तर वीज निर्मिती नाही.. 


केंद्र सरकारकडून कमी दरामध्ये गॅस उपलब्ध झाला तरच नवीन वीज निर्मिती शक्य आहे.इतर ठिकाणाहून गॅस घेऊन निर्माण होणारी वीज महाग ठरत आहे. महागडी वीज रेल्वेला खरेदी करणे शक्य नाही यामुळे प्रथम केंद्र सरकारने कमी दराचा गॅस द्यावा व विजेचा करार करावा यासाठी कंपनीकडून प्रयत्न सुरू आहे. यासाठी दिल्ली येथे कंपनीचे अधिकारी प्रयत्न करत आहेत.गुरुवारपासून बंद पडलेला हा प्रकल्प आणखी काही दिवस चालू राहावा यासाठी  एक महिन्याचा करार करण्याचे संकेत मिळत आहेत.परंतु एक महिन्यासाठी करार करून पुन्हा कंपनीची वीज निर्मिती ची टांगती तलवार कायम राहणार आहे.


1 एप्रिल पासून 30 कामगार झाले कमी..


 वीज खरेदीचा नवीन करार नसल्याने आरजीपीपीएल च्या यूपीएल कंपनी ने दोन महिन्यापूर्वी कंपनीतील 25 कामगारांना कमी केले होते,त्यानंतर कंपनीतील सी एम आर या ठेकेदार कंपनीचा कामाचा ठेका 31 मार्च 2022 पर्यंत होता. परिणामी 1 एप्रिलपासून सी एम आर या ठेकेदार कंपनी जवळ असलेले 30 कामगार कामावरून कमी झाले आहेत.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha