मुंबई : ठाण्यात 12 एप्रिलला होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेचा टीझर मनसेकडून रिलीज करण्यात आला आहे. गुढीपाडव्याच्या सभेमधे राज ठाकरेंच्या भाषणावर राजकीय प्रतिक्रियांना या सभेतून उत्तर दिलं जाणार आहे. राज ठाकरेंच्या 12 एप्रिलला पार पडणाऱ्या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
मनसे नेते संदिप देशपांडे यांनी ट्वीट करत याची माहिती दिली आहे. देशपांडे यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये शरद पवार, संजय राऊत आणि अजित पवार यांनी केलेल्या टीका आहेत. या सर्व टीकांवर राज ठाकरे ठाण्याच्या सभेत उत्तर देणार आहे. या सर्व टीकांना राज ठाकरे करारा जवाब देणार असे म्हटले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात केलेल्या भाषणावर उलटसुलट चर्चा अजूनही सुरु आहे. त्या सभेत राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे, मदरशांमधले गैरप्रकार यावर भाष्य केलं होतं. तसेच महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर चौफेर हल्ला चढवला होता.
गुढीपाडव्याच्या भाषणात राज ठाकरेंनी हिंदुत्वाच्या मुद्द्याची कास धरल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळेच त्यांनी मशिदींवरील भोंग्याच्या विषयाला हात घातला. आता 12 तारखेच्या ठाण्यातील सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
येत्या काही महिन्यांमध्ये राज्यातील महापालिकेच्या निवडणुका आहेत. परंतु त्याआधी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गुढीपाडवा मेळाव्या अगोदर राज ठाकरे यांनी पुण्यात मनसेच्या सोळाव्या वर्धापनदिनी मनसैनिकांना संबोधित केले होते. राज्यात सत्ताधारी पक्षांकडून काहीच काम होत नाहीत. विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांना संपवण्याचे कारस्थान करत आहेत. यामध्ये सामान्य जनता मात्र मनसेकडून मदत मागत असल्याचं मत राज ठाकरेंनी पुण्यातील सभेत मत व्यक्त केलं आणि आगामी महापालिका निवडणुकीत महाराष्ट्रात मनसेच एक सक्षम पर्याय असू शकेल, असा विश्वास सर्वसामान्यांना देण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
संबंधित बातम्या :
Raj Thackeray : राज ठाकरेंच्या ठाण्यातील सभेवरुन वाद; 9 एप्रिलऐवजी आता 12 एप्रिलला सभा होणार