Vinayak Mete : शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर राज्यभरात शोक व्यक्त होत आहे. विनायक मेटे हे भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू समजले जात होते. त्यामुळेच  विनायक मेटे यांच्या मनात फडणवीस यांना विशेष स्थान होते. मागील महिन्यात झालेल्या वाढदिवसानिमित्तच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस हेच मनातील मुख्यमंत्री असल्याचे मेटे यांनी म्हटले होते. 


मागील महिन्यात 16 जुलै रोजी विनायक मेटे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्रातील सभागृहात सत्कार सोहळा पार पडला होता. या सत्कार सोहळ्यात देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे इतर नेते उपस्थित होते.


यावेळी विनायक मेटे यांनी आपल्या सत्कार सोहळ्याला उत्तर देताना एक भाषण केले होते. यावेळी त्यांनी म्हटले की, वीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर आदीदेखील उपस्थित होते. 


शेवटच्या भाषणात काय म्हटले?


विनायक मेटे यांनी म्हटले की,  मी या अडीच वर्षाच्या सरकारमध्ये अनेक वेळा मोर्चे काढले, पण उद्धव ठाकरे, शरद पवार आणि अशोक चव्हाण यांनी त्याकडे लक्ष दिलं नाही. गेल्या अनेक वर्षांमध्ये मराठा समाजाच्या मागणीकडे कोणीही लक्ष दिले नाही. आरक्षण देण्याचं काम तुम्ही केले. मागील सरकारने एकाही समाजाला न्याय दिला नाही. ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण यांनी घालवले. सगळ्या समाजाच्या लोकांवर अन्याय करण्याचं काम मागील सरकारने  केला असल्याची टीका मेटे यांनी केली. तुमच्याबद्दल खात्री असून तुम्ही समाजाला न्याय द्याल, अशी अपेक्षा विनायक मेटे यांनी व्यक्त केली. आपल्याला कोणी न्याय देणारं असेल तर ते फक्त देवेंद्र फडणवीस आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत त्यांचा आम्हाला आदर आहे पण आमच्या मनात तुम्हीच मुख्यमंत्री आहेत, असेही मेटे यांनी म्हटले. तुम्ही सरकारमध्ये घेण्याचा शब्द दिला होता. तो शब्द जरी पाळला नसला तरी आम्ही तुमच्या सोबत असू असेही मेटे यांनी म्हटले. 


पाहा व्हिडिओ: Vinayak Mete Speech : माझ्या मनातले मुख्यमंत्री तुम्हीच, विनायक मेटेंची तुफान फटकेबाजी 


 



 

देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास कायम 


विनायक मेटे यांनी शनिवारी, 13 ऑगस्ट रोजी  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती. उद्धव ठाकरे यांनी भाजप हा लहान पक्षांना संपवत असल्याचे म्हटले होते. मात्र, मेटे यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर विश्वास व्यक्त केला होता. येत्या काळात आम्हाला जो शब्द देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे तो ते पाळतील असे विनायक मेटे यांनी म्हटले. 


विनायक मेटे यांनी म्हटले होते की, आम्ही जेवढे घटक पक्ष भाजपसोबत आहोत आमचा त्यांच्यावर संपूर्ण विश्वास आहे. वर्ष 2014 च्या युती सरकारमध्ये शिवसेना-भाजप सोबत होती यावेळी आम्ही सर्व घटक पक्ष देखील सरकारमध्ये होतो. मात्र त्यावेळी शिवसंग्राम वगळता सर्वांना मंत्रीपद मिळाली होती. काही अडचणीमुळे आम्हाला मंत्रीपद मिळालं नाही. मात्र येत्या काळात आम्हाला जो शब्द देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे तो ते पाळतील असा विश्वास मेटे यांनी व्यक्त केला होता. भाजप हा सर्व घटक पक्षाला सोबत घेऊन चालणारा पक्ष असल्याचे मेटे यांनी म्हटले.