नांदेड/परभणी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने संपूर्ण राज्यात 'ब्रेक द चेन' अंतर्गत कडक निर्बंध लागू केले आहेत. संचारबंदीच्या काळात मजूर, कामगार, गोरगरीब यांच्या जेवणाचे हाल होऊ नये यासाठी राज्यात शिवभोजन योजनेतून एक महिना शिवभोजन थाळी मोफत देण्यात येईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. काल (14 एप्रिल) रात्री 8 वाजल्यापासून राज्यात 15 दिवसांची संचारबंदी लागू झाली. या कालावधीत मोफत शिवभोजन असताना नांदेड जिल्ह्यातील केंद्रांवर चालकांकडून पैसे वसूल केले जात असल्याचं चित्र आहे. तर परभणीतील शिवभोजन केंद्रामुळे गरजूंना दोन वेळचं जेवण मिळत आहे. काही ठिकाणी शिवभोजन केंद्रांवर तुफान गर्दी झाल्याने सोशल डिस्टन्सचा बोजवारा उडाल्याचं पाहायलं मिळालं. जाणून घेऊया विविध जिल्ह्यातील शिवभोजन केंद्रांवरील परिस्थिती


नांदेडमध्ये पैसे घेऊन शिवभोजन थाळीचं वाटप
लॉकडाऊन कालावधीत गरजू, गरीब नागरिकांची उपासमार होऊ नये यासाठी राज्य सरकारने शिवभोजन थाळी मोफत दिली जाईल, अशी घोषणा केली आहे. परंतु राज्य सरकारच्या आदेशाला ठेंगा दाखवत शिवभोजन थाळी चालक पैसे घेऊन वाटप करत असल्याचं चित्र आहे. नांदेड शहरातील नवीन मोंढा परिसरातील शिवभोजन थाळी चालकांकडून ही वसुली होत असल्याचं निदर्शनास आलं आहे. याविषयी विचारणा केली असता आम्हाला शासनाचे आदेश मिळाले नसल्यामुळे आम्ही पैसे घेत असल्याची माहिती शिवभोजन चालकाने दिली. तर श्यामनगर शासकीय रुग्णालयातील शिवभोजन थाळी चालकांकडून गेल्या दोन दिवसांपासून मोफत भोजन वाटप होत असून शासनाचे आदेशही त्यांना आधीच मिळाल्याची माहिती त्यांनी दिली. तसंच तरोडा नाका परिसरातील शिवभोजन चालकाकडून 40 रुपये दराने शिवभोजन थाळीची विक्री होत आहे. तसेच काही शिवभोजन चालकांकडून फक्त 11 ते 12 या वेळेतच शिवभोजन मिळत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या पंधरा दिवसांच्या संचारबंदी दरम्यान गरीब गरजवंताना शिवभोजन मोफत मिळेल काय हा मोठा प्रश्न आहे


परभणीतील शिवभोजन केंद्रामुळे मिळतंय दोन वेळचं जेवण, गरजूंसाठी शहरातील तिन्ही केंद्रावरुन पार्सल सुविधा उपलब्ध 
सामान्य गोरगरिबांना दोन वेळेचं जेवण अल्पदरात मिळावे यासाठी सरकारने शिवभोजन केंद्र सुरु केली आहेत. संचारबंदीत याच शिवभोजन केंद्रावरुन दोन वेळचं जेवण गरजूंना मिळतं आहे. त्यामुळे ही केंद्रे सध्या मोठा सामन्यांचा मोठा आधार बनली आहेत. मुख्यमंत्र्यांनी संचारबंदी जाहीर केल्यानंतर या केंद्रांवरुन दोन पोळ्या, वरण, भात आणि भाजी असा मेन्यू पार्सलच्या स्वरुपात दिला जात आहे. परभणी शहरात तीन तर तालुक्यांमध्ये नऊ असे एकूण 12 केंद्रे जिल्ह्यात सध्या सुरु आहेत. 


शिवभोजनचा उपयोग
कोरोना विषाणूमुळे लागू केलेल्या संचारबंदीत राज्य सरकारच्या शिवभोजन थाळी योजनेची मदत होताना दिसत आहे. राज्यात सध्या 15 दिवसांची संचारबंदी आहे. रुग्ण संख्या वाढली आहे. अनेक घरांत सगळे सदस्य कोरोनाबाधित आहेत. अशा काळात गरिबांच्या उपासमारीची शक्यता लक्षात घेऊन शिवभोजन थाळी हा उपक्रम तालुका पातळीवरही राबवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ही थाळी दहा रुपयांऐवजी पाच रुपयांना देण्याचा निर्णय घेण्यात आला असून ती पार्सलही देता येणार आहे. त्याचा मोठ्या प्रमाणात गरजूंना लाभ होताना दिसत आहे. 


जळगावात शिवभोजन केंद्रावर गर्दी उसळली, सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य सरकारने अनेक निर्बंध लावत पंधरा दिवसांसाठी संचार बंदीची घोषणा केली आहे. या काळात गरीब आणि गरजू नागरिकांचे हाल होऊ नये यासाठी शिवभोजन केंद्रावर मोफत भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. काल रात्रीपासून संचारबंदी लागू केल्यानंतर,  जळगावातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या शिवभोजन केंद्रांवर जेवण घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली. यावेळी मात्र नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणे आवश्यक असताना, त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचं दिसून आलं.




शिवभोजन थाळी अनेक गरजूंसाठी मोठा आधार आहे. अवघ्या पाच रुपयांत अनेकांची भूक या योजनेतू भागवली जाते. मात्र कडक निर्बंध असताना ही शिवभोजन थाळी मिळणार की नाही असा अनेकांना प्रश्न पडला होता. हीच बाब लक्षात घेत राज्य सरकारने हा महत्त्वाच निर्णय घेतला.