मुंबई:  राज्य सरकारच्या 75 हजार नोकर भरती (Maharashtra Govt Recruitment)  पुन्हा रेंगाळण्याची शक्यता आहे. कारण एकाच वेळी राज्यभरात परीक्षा घेण्यासाठी नेमलेल्या दोन्ही नियुक्त कंपन्या एकाच वेळी परीक्षा घेण्यास असमर्थ असल्याने राज्य सरकारने जाहीर केलेल्या 75 हजार पदांच्या भरतीच्या वेगाला ब्रेक लागण्याची चिन्हे आहेत. 


प्रत्येक विभागात समान पदासाठी वेगळी परीक्षा घेणे ही सर्व प्रक्रिया राबवावी लागत आहे. त्यासाठी सरकारने टीसीएस आणि आयबीपीएस या कंपन्यांची नियुक्ती केली आहे.  आरोग्य विभागाच्या भरतीसाठी 15 लाख अर्ज येण्याची शक्यता आहे. संपूर्ण भरती प्रक्रिया राबविणे या कंपन्यांसाठी डोकेदुखी ठरत असून, ती वेळखाऊही आहे. दोन्ही कंपन्यांची एवढी मोठ्या परीक्षेचे नियोजन करण्याची  क्षमता नसल्याने  भरती प्रक्रिया लांबण्याची चिन्हे आहेत.


भंडारा जिल्ह्यासह राज्यातल्या अनेक ठिकाणी या दोन्ही कंपन्यांचे सेंटर नाहीत. त्यामुळे परीक्षा घ्यायच्या कसा असा प्रश्न निर्माण झाला आहे. आरोग्य विभागाच्या भरतीसाठी राज्यभरातून जवळपास 15 लाख उमेदवार अर्ज करण्याची क्षमता मात्र दोन्हीही कंपन्यांची एवढी क्षमता नाही. टीसीएस कंपनी एकावेळी राज्यात 7500 ते 8000 पर्यंत उमेदवारांची परीक्षा घेऊ शकते तर आयबीपीएस कंपनी दहा हजार ते पंधरा हजार एका वेळी एका शिफ्टमध्ये परीक्षा घेऊ शकतात. त्यामुळे या कंपन्यांच्या मर्यादेपेक्षा जास्त अर्ज आले तर परीक्षा घ्यायची कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे. सदस्य सचिव जिल्हा निवड समिती भंडारा यांनी ग्रामविकास विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना पत्र लिहून माहिती दिली आहे. त्यामुळे 75 हजार नोकर भरती रेंगाळण्याची शक्यता आहे. 


कोणत्या खात्यांमध्ये किती भरती होऊ शकते?



  • आरोग्य खाते – 10 हजार 568

  • गृह खाते – 11 हजार 443

  • ग्रामविकास खाते – 11,000

  • कृषी खाते – 2500

  • सार्वजनिक बांधकाम खाते – 8,337

  • नगरविकास खाते – 1500

  • जलसंपदा खाते – 8227

  • जलसंधारण खाते – 2,423

  • पशुसंवर्धन खाते – 1,047


किती जागा रिक्त?



  • गृहविभाग- 49 हजार 851 

  • सार्वजनिक आरोग्य विभाग : 23 हजार 822 

  • जलसंपदा विभाग : 21 हजार 489 

  • महसूल आणि वन विभाग : 13 हजार 557

  • वैद्यकीय शिक्षण विभाग : 13 हजार 432 

  • सार्वजनिक बांधकाम विभाग : 8 हजार 12

  • आदिवासी विभाग : 6 हजार 907

  • सामाजिक न्याय विभाग : 3 हजार 821


कोरोनामुळे गेल्या तीन वर्षांमध्ये  नोकर भरती होऊ शकली नाही. त्यामुळे देशाच्या  अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 75 हजार नोकर भरती केली जाणार आहे. त्यामुळे येत्या काही कालावधीत ही वेगवेगळ्या विभागाच्या नोकर भरती होताना पाहायला मिळतील. मात्र गेल्या काळात नोकर भरती करत असताना अनेक वादग्रस्त निर्णय होताना पाहायला मिळाले आहेत. आता पारदर्शकपणे ही नोकर भरती राज्य सरकार कशा पद्धतीनं करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.