मुंबई : मागील तीन दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीन केलेल्या कारवाईमुळे आता त्याचं नाव घराघरात पोहचलं आहे. ईडीने केलेल्या कारवाईची मूळ तक्रार ही महविकास आघाडीतीलच एका नेत्याने केली असल्याचं आता समोर आलं आहे. संजय निरुपम यांच्यामुळे रवींद्र वायकर यांच्या विरुद्धची चौकशी मुख्यमंत्री यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यापर्यंत पोहचली.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावरील कारवाई संजय निरुपम यांनी 2016 साली रविंद्र वायकर यांच्या विरुद्ध केलेल्या एका तक्रारीवरून झाली असल्याची बाब आता समोर आली आहे. 2016 मध्ये निरुपम यांनी वायकर यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार, भूखंड लाटण्याचे आरोप केले. निरुपम यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली. सोबतच ईडीला पत्र देखील लिहिलं. 2016 नोटाबंदी झाल्यांनतर पुष्पक ग्रुपवर 84 कोटींच्या जुन्या नोटा बदलण्याचा गैरव्यवहार केल्याचा गुन्हा दाखल झाला आणि यामध्ये पहिल्यांदा महेश पटेल आणि चंद्रकांत पटेल ईडीच्या रडारवर आले.  त्याच वेळेला संजय निरुपमने ईडीला वायकर आणि चंद्रकांत पटेल यांच्या संबंधांची माहिती दिली. 


निरुपम यांनी रवींद्र वायकर यांच्यावर आरोप केल्यानंतर ईडीने पुष्पक ग्रुपचे चंद्रकांत पटेल यांचा तपास पुढे नेला. 2019 मध्ये चंद्रकांत पटेल यांना अटक झाली आणि ही अटक झाल्यानंतर संजय निरुपमने वायकर आणि पटेल यांच्या आर्थिक व्यव्हाराची पूर्ण माहिती ईडीला दिली आणि तिथूनच पटेल यांच्या राजकीय कनेक्शनचा तपास सुरु झाला. 


 ईडीने केलेल्या चौकशीत त्यानंतर महेश पटेल, चंद्रकांत पटेल संचलित पुष्पक बुलियनचं नाव समोर आलं.  ईडीने त्यांची तब्बल 21 कोटी रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त केली. त्यानंतर करण्यात आलेल्या तपासात हे समजले की, महेश पटेल यांच्या पुष्पक रिअलिटीने एका व्यवहारासाठी विविध स्तरांचा वापर करून 20.02 कोटी रुपयांचा निधी नंदकिशोर चतुर्वेदी नामक व्यक्तीला वळवले होते.


नंदकिशोर चतुर्वेदी हे अनेक शेल कंपन्या चालवतात. त्यांच्या कंपन्यांपैकी एक कंपनी हमसफर डीलर प्रायव्हेट लिमिटेड मार्फत श्रीधर पाटणकर यांच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडला 30 कोटींचे कर्ज कुठलेही तारण न ठेवता देण्यात आले. म्हणजेच महेश पटेलांचे पैसे नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या मार्फत श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडमध्ये गुंतवण्यात आले. एकंदरीतच संजय निरूपम यांनी रवींद्र वायकर यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर आता हे सर्व प्रकरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरापर्यंत येऊन पोहचलं आहे. त्यामुळे आगामी काळात महविकास आघाडीच्या नेत्यानेच समोरं आणलेल्या प्रकरणामुळे मुख्यमंत्र्यांच्या डोकेदुखीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.  


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha