Anil Deshmukh : मनी लाँड्रिंग प्रकरणी अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात नियमित जामीनासाठी याचिका दाखल केली आहे. त्यावर शुक्रवारी सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे. मुंबई सत्र न्यायालयानं जामीन फेटाळल्याच्या निर्णयाला देशमुखांनी या याचिकेतून हायकोर्टात आव्हान दिलं आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या लेटर बॉम्बमुळे अडचणीत सापडलेल्या देशमुखांची ईडी मनी लाँड्रिंग कायद्याअंतर्गत चौकशी करत आहे. 21 एप्रिल 2021 रोजी, देशमुखांविरोधात गुन्हा नोंदवून 2 नोव्हेंबर रोजी ईडीनं अनिल देशमुखांना अटक केली. अनिल देशमुख हे सध्या आर्थर रोड कारागृहात आहेत. याआधी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टानं 17 जानेवारी रोजी देशमुखांचा डिफॉल्ट जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर देशमुखांनी पीएमएलए न्यायालयात नियमित जामीन अर्ज केला होता. मात्र, न्यायाधीश राहुल रोकडे यांनी 18 मार्च रोजी देशमुखांचा जामीन अर्ज फेटाळून लावला.


 

या प्रकरणी झालेल्या आर्थिक गैरव्यवहारात देशमुख सक्रिय असल्याचं सकृतदर्शनी पुराव्यातून समोर येत आहे. तसेच पोलीस दलातील बदल्या आणि नियुक्त्यांमध्येही देशमुखांकडून हस्तक्षेप होत असल्याचं समोर आल्याचं निरीक्षण न्यायालयानं आपल्या निकालपत्रात नोंदवत देशमुखांना जामीन देण्यास नकार दिला होता. त्यानिर्णयाला आव्हान देत देशमुखांनी उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला असून त्यावर शुक्रवारी न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्यासमोर सुनावणी पार पडणार आहे.

 

मुंबई माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर 100 कोटी वसुलीचे आरोप केले होते. त्यानंतर त्यांच्या घरावर ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाने छापेमारी केली. मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी अनिल देशमुख यांना ईडीनं पाच वेळा समन्स बजावलं होतं. मात्र, त्यानंतर अनिल देशमुख ईडीसमोर हजर राहिले नव्हते. यानंतर त्यांच्या नावानं लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं. तसेच त्यांना शोधण्यासाठी सीबीआयची मदत मागण्यात आली. याचदरम्यान, 1 नोव्हेंबर रोजी ईडीच्या कार्यालयात हजर झाले. त्यावेळी त्यांची तब्बल 12 तास चौकशी करण्यात आलीय. त्यानंतर ईडीनं त्यांच्याविरोधात अटकेची कारवाई केली होती. या कारवाईमुळं राज्यात एकच खळबळ माजली होती.


नेमकं प्रकरण काय? - 
मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटिलिया स्फोटकं प्रकरण समोर आल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या. ही स्फोटकं ठेवण्यामागे आणि ज्या स्कॉर्पिओ कारमध्ये स्फोटकं ठेवली होती त्या कारचा मालक मनसुख हिरेन याच्या हत्येमागे पोलीस अधिकारी सचिन वाझे याचा हात असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली होती. या घटनेनंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली. त्यानंतर परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्याकडून 100 कोटींची वसुली केल्याचा आरोप केला. या प्रकरणी ईडीने तपास करत अनिल देशमुख यांच्या घर आणि कार्यालयावर छापे टाकले. ईडीच्या अटकेची कारवाई टाळण्यासाठी देशमुख यांनी मुंबई हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. पण, कोर्टानं त्यांची याचिका फेटाळून लावली होती. अखेर अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले आणि चौकशीअंती अटकेची कारवाई झाली.