Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करत जवळपास 50 आमदार फोडले. त्यांनतर भाजपला सोबतीला घेऊन सत्तास्थापन केली. आता मुख्यमंत्री सुद्धा झाले आहेत. मात्र त्यांनतर सुद्धा शिवसेनेतील बंडखोरी सुरूच आहे. दरम्यान यावरूनच भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. शिवसेनेत फक्त उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे उरतील असा टोला त्यांनी लगावला आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने दानवे हे देव दर्शनासाठी पंढरपूर येथे आले होते. 


यावेळी बोलतांना दानवे म्हणाले की, अडीच वर्षांपूर्वी राज्यातील जनतेने विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेला बहुमत दिले होते. मात्र विचाराशी फारकत घेत उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी-काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली. पण खुद्द शिवसेनेच्या आमदारांना ही युती मान्य नव्हती. त्यामुळे आज जे बाहेर पडले आहेत ते खरे शिवसैनिक आहे. तर शिवसेनेत फक्त दोनचं लोकं शिल्लक राहणार असून, एक उद्धव ठाकरे आणि दुसरे आदित्य ठाकरे अशी खोचक टीका दानवे यांनी यावेळी केली. 


उद्धव ठाकरेंनी आता शांत बसावे...


यावेळी पुढे बोलताना दानवे म्हणाले की, उद्धव ठाकरे आमचे प्रिय मित्र होते मात्र आता पूर्व मित्र झालेत. त्यामुळे त्यांना एकच सल्ला आहे की, त्यांनी ज्या विचारला तिलंजीली देऊन सरकार स्थापन केले होते, ते ना त्यांच्या आमदारांना मान्य होते नाही राज्यातील जनतेला मान्य होते. त्यामुळे आता जे व्हायचं होतं ते झालं, त्यांनी आता शांत राहावे. आपल्याच आमदार-खासदार यांच्यावर बोलण्यासाठी जे काही पिलावळ सोडले आहेत त्यांना थांबवावे असं दानवे म्हणाले. 


राऊतांना दिला सल्ला...


यावेळी संजय राऊत यांना सल्ला देतांना दानवे म्हणाले की, एवढी मोठी शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांनी एक-एक माणूस वेचून उभी केली. त्या शिवसेनेची तुकडे-तुकडे करण्यास संजय राऊत यांचा मोठा सहभाग आहे. आता त्यांनी सांभाळाव, वाक्य जरा जपून बोलावे. जी काही शिवसेना हातात राहिली असेल, त्याचे तुकडे होऊ देऊ नका. असा सल्ला दानवे यांनी राऊतांना दिला.